![]()
चांदूर बाजार शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. हा मार्ग चांदूर बाजार-वलगाव रस्त्यावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जातो आणि शॉर्टकट म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. गुलजार पेठ, चांदूर बाजार आणि परतवाडा मार्गांना जोडणारा असल्याने या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आणि पिकअप वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. याच रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, खासगी शिकवणी वर्गांचे विद्यार्थी तसेच रुग्णांची सतत ये-जा असते. मार्गावर स्त्रीरोग तज्ज्ञांचे रुग्णालय, बालरोग तज्ज्ञांचे दवाखाने आणि खासगी कोचिंग क्लासेस असल्याने लहान मुले, महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच, उघड्या पडलेल्या लोखंडी सळ्यांमध्ये पाय अडकून पादचाऱ्यांना दुखापत झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शिवाजीनगर परिसरात शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि मंगल कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या वर्षभरात या रस्त्याची साधी डागडुजीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रल्हादपूर येथील शिवाजीनगर भागातील या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, उघड्या लोखंडी सळ्या झाकाव्यात आणि खड्डे बुजवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग की शिरजगाव बंड ग्रामपंचायत, यापैकी कोणीही जबाबदारी स्वीकारत नसून निव्वळ ढकलाढकली सुरू आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Source link
चांदूर बाजारमध्ये रस्ता उखडला, खड्डे वाढले:विद्यार्थी, रुग्णांसह वाहनधारकांना अपघाताचा धोका