Headlines

अमरावतीत तीन ठिकाणी आंदोलन; इर्विन चौक, कलेक्ट्रेटवर निदर्शने:केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कलेक्ट्रेटवर निदर्शने‎


.

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ”चलो संसद” आणि इतर न्याय मागण्यांसाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरात आज, सोमवारी तीन ठिकाणी आंदोलन केले गेले. इर्विन चौकात भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी निदर्शने केली. कलेक्ट्रेटवर विविध संघटनांच्या विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविला तर संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

दरम्यान इतर दोन संघटनांनीही आंदोलनाच्या शेवटी सोनम वांगचूक यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशा आशयाचे पंतप्रधान यांच्या नावे लिहलेले निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. इर्विन चौकातील आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश पदाधिकारी विजय चोरपगार यांनी केले. तर दुसरीकडे संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्यावतीने आरडीसी यांना निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी हरिष चरपे, सुनील घटाळे, हरिश केदार, प्रा. प्रवीण गुल्हाने, मुकूंद काळे आदी उपस्थित होते.

शिक्षण आणि रोजगार हा तरुणांचा घटनात्मक हक्क आहे. मात्र, शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य तो न्याय आणि भरपाई मिळावी, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून सोनम वांगचूक यांनी मागणी केल्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशा मागण्या यावेळी रेटण्यात आल्या.

तिन्ही ठिकाणच्या आंदोलनात अमरावती जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

कॅम्प रोडवर वाहतूक कोंडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गर्ल्स हायस्कुल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनात अनेक संघटनांचे विद्यार्थी सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. परिणामी गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी काही वेळासाठी कलेक्ट्रेटकडून गर्ल्स हायस्कुलकडे जाणाऱ्या रस्त्यावरुनच दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक वळविली होती. दुपारी ३ नंतर ही वाहतूक सुरळीत झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *