![]()
मुंबईच्या नगरपाल (शरीफ) कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक (गट क) या पदांसाठी रविवारी अमरावतीत स्पर्धा परीक्षा झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) या परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी एकूण ३२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात १८८९ उमेदवारांनीच हजेरी लावली. त्यामुळे तब्बल १३१८ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजताच परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आदेश होते, कारण तपासणीचे अनेक टप्पे होते. अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालय, ज्ञानमाता हायस्कुल, गोल्डन कीडस् इंग्रजी शाळा, शासकीय आयटीआय, भारतीय महाविद्यालय, समर्थ हायस्कुल, ब्रजलाल बियाणी महाविद्यालय, नारायणदास लढ्ढा हायस्कुल, भंवरीलाल सामरा इंग्रजी शाळा आणि दीपा इंग्रजी प्राथमिक शाळा या दहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. पहिला पेपर सकाळी ११ ते १२ तर दुसरा दुपारी ३ ते ४ या वेळेत झाला. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्या नेतृत्वात सुमारे ३१० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परीक्षेचे कामकाज पाहिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे महसूल अधिकारी जे.के. टापरे यांनी समन्वयक म्हणून काम केले. दहापैकी कोणत्याही केंद्रावर परीक्षेदरम्यान कोणतीही चुकीची घटना घडली नाही. पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात जमावबंदी लागू केली होती. या परीक्षेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्या पेपरला उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी दुसऱ्या पेपरला दांडी मारली. एकूण ३२०० विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पेपरला १८८९ तर दुसऱ्या पेपरला १८११ उमेदवारांनी हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरातून या परीक्षेसाठी २२ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती.
Source link
अमरावतीत MPSC परीक्षेला 1318 उमेदवार गैरहजर:मुंबईच्या नगरपाल कार्यालयातील बेलीफ आणि लिपिक पदासाठी होती परीक्षा; 3200 पैकी 1889 जण उपस्थित