Headlines

अमरावती विद्यापीठातील सभागृहाला दीनदयाल उपाध्याय यांचे नाव द्या:राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांची कुलगुरूंना मागणी




संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साकार होत असलेल्या बहुउद्देशीय सभागृहाला (दीक्षांत सभागृह) ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ असे नाव देण्याची मागणी राज्यपाल नामित अधिसभा (सिनेट) सदस्यांनी केली आहे. ही मागणी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे करण्यात आली. अमरावती विद्यापीठाच्या विस्तीर्ण परिसरात हे बहुउद्देशीय सभागृह सध्या आकाराला येत आहे. हे सभागृह विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्याचे प्रतीक मानले जाते. सिनेट सदस्यांनी आपल्या मागणीचे समर्थन करताना सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय हे एक थोर राष्ट्रचिंतक, तत्त्वज्ञ, समाजसेवक आणि ‘एकात्म मानववाद’ या विचारधारेचे प्रणेते होते. त्यांनी राष्ट्रहित, सामाजिक समरसता, अंत्योदय आणि मूल्याधिष्ठित विकासाचा पुरस्कार केला. त्यांचे विचार आजही शिक्षण, समाजजीवन आणि राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणादायी आहेत. अशा सभागृहास त्यांचे नाव दिल्यास विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा मिळेल, तसेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव होईल, असे सदस्यांचे म्हणणे आहे. या प्रस्तावाला कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही सदस्यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरेने त्यादृष्टीने पावले टाकावीत आणि प्रस्तावित सभागृहाचे नामकरण ‘पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह’ असे करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी सिनेट सदस्य राजेंद्र पाण्डे, श्रीकांत काळीकर, डॉ. श्याम मुंजे, आशिष सावजी, सुनील तिप्पट, गिरीश शेरेकर, अमोल ठाकरे, अमित देशमुख आणि पल्लवी कुळकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *