Headlines

अमरावती विद्यापीठाला शैक्षणिक विकास केंद्राची मंजुरी:भारतीय विद्यापीठ संघाने दिली मान्यता; गुणवत्ता वाढीस मदत




संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘शैक्षणिक व प्रशासकीय विकास केंद्र’ स्थापन करण्यास भारतीय विद्यापीठ संघाने (एआययू) मंजुरी दिली आहे. विद्यापीठाचे कामकाज अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाने या केंद्रासाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठवला होता, ज्याला एआययूने मान्यता दिली आहे. एआययूचे हे केंद्र विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘क्षमता बांधणी’साठी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल. यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ई-गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशिन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांवर प्रशिक्षण दिले जाईल. या केंद्राचे मुख्य ध्येय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-2020), भारतीय ज्ञान प्रणाली आणि शाश्वत विकास उद्दिष्टांना गती देणे हे आहे. हे केंद्र विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्राच्या स्थापनेनंतर विद्यापीठाला वर्षातून किमान पाच ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (FDP) आयोजित करणे अनिवार्य असेल. यापैकी एक कार्यक्रम विद्यापीठीय प्रशासक आणि संस्थात्मक प्रमुखांसाठी घेणे आवश्यक आहे. या केंद्रामुळे विद्यापीठातील संशोधन आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींना चालना मिळेल, अशी अपेक्षा भारतीय विद्यापीठ संघाने व्यक्त केली आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी आणि कामकाजासाठी भारतीय विद्यापीठ संघ (एआययू) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला एक लाख रुपयांचे बीज अनुदान देणार आहे. या केंद्रामुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण सुधारण्यास मदत होईल आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठीही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *