Headlines

अवैध वाळू वाहतुकीवर जामखेड पोलिसांची कारवाई:16.20 लाखांचा मुद्देमाल जप्त, पिंपरखेड परिसरात चार ट्रॅक्टर-ट्रॉली केल्या जप्त, चार जणांवर गुन्हा दाखल



जामखेड तालुक्यातील पिंपरखेड परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर जामखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत चार ट्रॅक्टर-ट्रॉलींसह सुमारे १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे, पोलीस नाईक रवींद्र वाघ, पोलिस कॉन्स्टेबल योगेश ढवळी व ज्ञानेश्वर बेलेकर यांनी ही कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पिंपरखेड ते बावी रस्त्यावर चार ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून चार ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या. चौकशीत चालकांची नावे शाकीर हुसेन शेख (३५), अर्जुन बलभीम लबडे (४२), रामदास नवनाथ कदम (३५) आणि अंगद सर्जेराव कदम (३२), सर्व रा. पिंपरखेड, ता. जामखेड अशी असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान चार ट्रॅक्टर-ट्रॉली आणि त्यामधील चार ब्रास वाळू असा एकूण १६.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल योगेश ढवळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत. दरम्यान, जामखेड तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचे प्रकार अद्याप सुरू असल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सातत्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यापुढेही अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असे प्रभारी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्पष्ट केले.

कारवाई एका नजरेत ठिकाण : पिंपरखेड, ता. जामखेड कारवाई करणारे : जामखेड पोलीस जप्त ट्रॅक्टर-ट्रॉली : ४ जप्त वाळू : ४ ब्रास एकूण मुद्देमाल : ₹१६.२० लाख गुन्हा दाखल : ४ जणांविरुद्ध



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *