Headlines

आईने बचत गटातून पैसे काढून मला उभं केलं:मदर्स डे निमित्त संजू राठोडचा आईला सलाम; महालक्ष्मी सरसमध्ये सांगितला संघर्षाचा प्रवास




मुंबईच्या बीकेसी येथे सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस 2026’ या भव्यदिव्य प्रदर्शनामध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. 10 मे 2026 रोजी झालेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमात खानदेशातील गावातून पुढे आलेला आणि आज जगभर आपल्या गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेला सुप्रसिद्ध मराठी गायक संजू राठोड याने उपस्थिती लावत प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र यावेळी त्याने केवळ गाण्यांनीच नव्हे, तर आपल्या आयुष्यातील आई आणि बचत गटाशी जोडलेली भावनिक आठवण सांगत अनेकांना भावूक केले. यावेळी मदर्स डे निमित्त बोलताना संजू राठोड विशेष भावूक झाला. “आज मी जे काही आहे, त्यामागे माझ्या आईची खूप मोठी साथ आहे. मला गाण्यांमध्ये करिअर करायचं होतं, पण त्या काळात माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या आईने बचत गटामधून पैसे काढून मला मदत केली. तिच्या विश्वासामुळे आणि त्यागामुळेच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली,” अशी आठवण त्याने सांगितली. पुढे बोलताना तो म्हणाला, “आज मदर्स डेच्या दिवशी अशा कष्टकरी महिलांसमोर परफॉर्म करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जगातील प्रत्येक आईला माझा सलाम आणि खूप खूप प्रेम. त्या आहेत म्हणून आपण आहोत.” कार्यक्रमादरम्यान बोलताना संजू राठोडने ‘महालक्ष्मी सरस 2026’चे आणि येथे सहभागी झालेल्या महिला बचत गटांचे मनापासून कौतुक केले. महाराष्ट्रातील अनेक महिला स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर उभ्या राहत असून, त्यांना स्वतःच्या उत्पादनांना मोठं व्यासपीठ या प्रदर्शनामधून मिळत असल्याचे त्याने सांगितले. तसेच ज्यांनी अजून या प्रदर्शनाला भेट दिलेली नाही, त्यांनी आवर्जून येथे यावं आणि महिलांच्या उत्पादनांना पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्याने केलं. संजू राठोडच्या या आठवणींनी आणि त्याच्या उपस्थितीमुळे ‘महालक्ष्मी सरस 2026’मधील वातावरण अधिक उत्साही आणि प्रेरणादायी बनले. महिला बचत गटांच्या संघर्षाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला त्याचा सलाम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. महालक्ष्मी सरस 2026 च्या कालावधीत वाढ मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. येथील प्रदर्शन पाहून, मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहून या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली असून आता 17 मेपर्यंत या प्रदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रदर्शनानंतर त्यांनी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे कौतुक करत सांगितले, की 10 मे पर्यंत प्रदर्शनामध्ये तब्बल 22 कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शन लाभलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन भव्य स्वरूपात उभारण्यात आले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले, की राज्यातील 550 हून अधिक बचत गटांचे स्टॉल तसेच राज्याबाहेरील 70 हून अधिक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिलांना रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळाल्याने त्यांच्या हाताला काम मिळाले आहे. प्रदर्शनात सहभागी महिलांसाठी उत्तम निवास व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण फूड कोर्ट आणि स्टॉल वातानुकूलित आहेत. व्यवस्थापन अत्यंत पद्धतशीरपणे करण्यात आल्यामुळे मुंबईकर उत्साहाने खरेदी करत आहेत, असे म्हणत त्यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *