![]()
शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला राज्यातील एकमेव बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने मंगळवारी दुपारी १२.१५ ते १ या वेळेत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणार्या ओढ्याच्या तीरांवर उत्साहात झाला. दोन्ही गावांमधील महिलांनी सनई, हलगीच्या तालावर ओढ्यावर येऊन, एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत, ही अनोखी परंपरा कायम ठेवली. नागपंचमीच्या दुसर्या दिवशी होणारा सुखेड व बोरी या गावांमधील बोरीचा बार राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांमधील महिला एकत्र येऊन, एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूंकडील महिला हातवारे करत शिव्या देतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभी राहून, दोन्ही गावांमधील महिलांना एकमेकींपासून लांब नेण्याचा प्रयत्न करतात. पाहा व्हिडिओ श्रावणातील षष्ठीला बोरीचा बार साजरा होताना, हलगी व सनईच्या सुराने महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावांमधील महिला ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून झिम्मा, फुगडी, फेर धरत या महिला ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी असल्याने, त्यांनी सुरवातीला ओढ्याच्या काठांवर उभे राहून, शिव्यांचा भडीमार करत, बोरीच्या बाराची सुरुवात केली. त्यानंतर महिला पाण्यात उतरल्या. एकमेकींवर पाणी उडवून, त्यांनी बोरीचा बार उत्साहात साजरा केला. यावेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. बोरीच्या बाराची दंतकथा या बोरीच्या बारासंदर्भात दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. त्यापैकी एक सुखेडची दुसरी बोरीतील होती. त्या दररोज दोन्ही गावांच्या शिवेवरील ओढ्यावर धुणे धुवायला जात होत्या. तेथे त्यांच्यात वाद होऊन, दोघी हातवारे करत, एकमेकींना शिव्या द्यायच्या. बोरीच्या बाराची ही प्रथा शेकडो वर्षांपासून असल्याचे ग्रामस्थ सांगतात. बोरीचा बार पाहण्यासाठी केवळ सातारा जिल्ह्यातू नव्हे, तर इतर जिल्ह्यांमधूनही लोक गर्दी करतात.
Source link
जोरदार शिव्यांच्या भडिमारात बोरीचा बार:बोरी व सुखेड गावांमधील महिलांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा