![]()
महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर–मुंबई आणि अमरावती–पुणे या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गांवर दोन्ही दिशांनी विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे सोलापूर आणि अमरावतीसारख्या शहरांना राज्यातील प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रांशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच मोठ्या शहरांबरोबरच लहान आणि मध्यम शहरांमध्येही हवाई वाहतुकीचे जाळे विस्तारावे, या उद्देशाने ‘उडान’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सुधारित स्वरूपात राज्यांना प्रादेशिक हवाई मार्ग निश्चित करण्याच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय सहभागाची संधी देण्यात आली आहे. सुधारित ‘उडान’ योजनेअंतर्गत आव्हानाधारित निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्रत्येक राज्याला चार हवाई मार्ग आणि दोन विमानतळ प्रस्तावित करण्याची संधी उपलब्ध आहे. संबंधित राज्यातील प्रवाशांची गरज, प्रादेशिक संपर्काचे महत्त्व आणि हवाई वाहतुकीच्या विस्ताराची क्षमता लक्षात घेऊन मार्ग प्रस्तावित करता येणार आहेत. याच संधीचा उपयोग करत महाराष्ट्रासाठी सोलापूर–मुंबई–सोलापूर आणि अमरावती–पुणे–अमरावती या मार्गांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर आणि अमरावतीसाठी महत्त्वाची संधी सोलापूर हे वस्त्रोद्योग, व्यापार, धार्मिक पर्यटन आणि कृषी आधारित उद्योगांसाठी ओळखले जाणारे महत्त्वाचे शहर आहे. सोलापूर ते मुंबई थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक तसेच विविध कामांसाठी मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. त्याचबरोबर सोलापूरच्या औद्योगिक आणि पर्यटनविषयक संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक, व्यापारी आणि कृषी केंद्र आहे. पुणे हे उच्च शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि रोजगाराच्या संधींसाठी देशातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. अमरावती आणि पुणे यांच्यात थेट हवाई संपर्क निर्माण झाल्यास विद्यार्थी, पालक, उद्योजक, व्यावसायिक आणि नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. केवळ प्रवास नाही, तर विकासाच्या नव्या संधी प्रादेशिक हवाई वाहतूक वाढल्यामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचत नाही, तर संबंधित शहरांच्या विकासालाही गती मिळते. उद्योगांना नव्या बाजारपेठांशी जोडण्याची संधी उपलब्ध होते. शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची सोय होते. पर्यटनाला चालना मिळते आणि प्रादेशिक पातळीवरील आर्थिक व्यवहार वाढण्यास मदत होते.
Source link
उडान योजनेत सोलापूर-मुंबई, अमरावती-पुणे हवाई मार्गांची निवड:महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीला नवी चालना, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती