![]()
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघात निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, महानगरपालिकेच्या परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेता दालनाचे उद्घाटन ढोल-ताशे, नगाडे, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत करण्यात आले. या प्रकरणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या मनपातील गटनेत्यासह कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे विरोधी पक्ष नेता समीर साजिद (बिल्डर) यांनी केली आहे. या संदर्भात समीर साजिद बिल्डर यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई) तसेच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर, मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रातील तपशीलानुसार, दिनांक 14/10/2026 रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिकेच्या परिसरात गटनेता वंचित आघाडी यांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी मनपा परिसरात ढोल, ताशे, नगाडे वाजवण्यात आले, फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली तसेच जोरदार घोषणाबाजी देखील झाली. सध्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक व आदर्श आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारचा कार्यक्रम करणे अयोग्य आहे. तसेच या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित गटनेता, उपस्थित नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी विरोधी पक्ष नेता समीर साजिद बिल्डर यांनी पत्राद्वारे केली आहे.
Source link
संभाजीनगरात वंचित विरुद्ध 'एमआयएम':वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करा; मनपा विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांची मागणी