![]()
पुण्यात सायबर चोरट्यांनी आधारकार्डच्या गैरवापराची भीती दाखवून एका संगणक अभियंता महिलेची १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी हा गंडा घातला. नवी पेठेत राहणाऱ्या ४१ वर्षीय महिलेला चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या आधारकार्डचा गैरवापर करून मुंबईतील हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित केल्या आहेत आणि या प्रकरणात गुन्हेगार सामील आहेत. कारवाईची आणि अटकेची भीती दाखवत, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर महिलेने चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने १४ लाख रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला जानेवारी महिन्यात मोबाइलवर संदेश पाठवून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. गेल्या पाच महिन्यांत चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी २५ लाख रुपये ऑनलाइन जमा करून घेतले, परंतु कोणताही परतावा दिला नाही. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे पुढील तपास करत आहेत. याशिवाय, नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीची २२ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटनाही समोर आली आहे. तक्रारदाराच्या मोबाइलवर संपर्क साधून चोरट्यांनी नागपूरमधील एका खासगी कंपनीत नोकरीची संधी असल्याचे सांगितले. कागदपत्रांची पूर्तता आणि नियुक्ती पत्राच्या नावाखाली त्यांनी पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात २२ लाख ७ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने खराडी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
आधारकार्ड गैरवापराची भीती दाखवत १४ लाखांचा गंडा:मुंबई गुन्हे शाखेच्या नावाने सायबर चोरट्यांनी केली फसवणूक