Headlines

आरोग्य सेवेत एआयचा वापर:चिंतन शिबिराचे उद्घाटन; दर्जेदार आरोग्य सेवेसाठी विभाग कटिबद्ध – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर




सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या दोन दिवसीय राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील कुमार बर्नवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ व धोरणकर्ते, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, प्रतिबंध हाच आजार टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत असून, त्याचा उपयोग नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्लिनिकचा १७ हजारांहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. या चिंतन शिबिराचा उपयोग पुढील दिशा ठरवण्यासाठी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बर्नवाल यांनी नमूद केले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांचा आरोग्य सेवेवरील स्वतःच्या खिशातून होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या योजनेतून आतापर्यंत ११ कोटींहून अधिक रुग्णांवर उपचार झाले आहेत. एआयसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. आरोग्य क्षेत्रात एआयच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण विकसित केले जात असून, ते आरोग्य सेवेमध्ये सर्वसमावेशक वापरासाठी मार्गदर्शन करेल. शिबिराच्या पहिल्या दिवशी एबीपीएमजेएवाय व एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. की-परफॉर्मन्स इंडिकेटर्स (केपीआय), क्लेम्स डेटावर आधारित विश्लेषण, तसेच डिजिटल हेल्थ सुविधांची सादरीकरणे यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून त्यांच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुभवांवर सादरीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी आयटी अपडेट्स, एनएचसीएक्स सक्षम एचएमआयएस प्रणालीचे प्रात्यक्षिक, हेल्थ डेटा अॅनालिटिक्स युनिटचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. यासोबतच एम्सद्वारे विकसित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पीएमजेएवाय आयटी प्लॅटफॉर्मवरील विविध योजनांचे एकत्रीकरण, पीएम-राहत उपक्रम आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एबीडीएमची अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *