.

इगतपुरी तालुक्यात २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील एकूण पर्जन्यमान १,४५९ मिमीवर पोहोचले आहे. पावसासोबत सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात महावितरणच्या यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावांत १ विजपुरवठा खंडित झाला आहे.
वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत, तर वीजवाहिन्या तुटल्याने वीज वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सतत पडणारा पाऊस, चिखल आणि प्रतिकूल हवामानामुळे दुरुस्तीच्या कामात कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होत आहे. युद्धपातळीवर काम सुरू अनेक ठिकाणी पोल कोसळल्यामुळे नुकसान मोठे आहे.
महावितरण कर्मचारी भर पावसात दुरुस्तीचे काम करत आहेत. हवामान अनुकूल होताच वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दिंडोरी |मुसळधार पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील खिर्डी ते भाटी गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाला मोठे भगदाड पडले आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा धोका वाढला असून, ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात खिर्डी येथील शेतकरी रामदास डोळे यांचा बैल वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. ऐन शेतीच्या हंगामात बैल वाहून गेल्याने डोळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास आणि पुलाची दुरुस्ती न केल्यास ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, पुराच्या पाण्यात उतरू नये आणि आवश्यक ती खबरदारी बाळगावी, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
खिर्डी–भाटी हा मार्ग स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र, पुलाला पडलेल्या भगदाडामुळे येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास या भागातील संपर्क व्यवस्था विस्कळीत होण्याचा धोका आहे.