![]()
अमेरिका आणि इराण यांच्यात आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाची झळ आता थेट महाराष्ट्राला बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पुण्याचे मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक भारतीय खलाशी बाधित झाले असून, परराष्ट्र मंत्रालयाने इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या भ्याड हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेला थेट लक्ष्य करणे शक्य नसल्याने इराणकडून आता अमेरिकेचे मित्र राष्ट्र आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांना लक्ष्य केले जात आहे. या जागतिक संघर्षामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्यासारखे आर्थिक फटके बसत असतानाच, आता भारतीयांच्या जीवितहानीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. पश्चिम आशियातील या युद्धात आतापर्यंत तब्बल 14 भारतीयांचा बळी गेला आहे. हेरंब करमरकर यांचा मृत्यू सायप्रसचा ध्वज असलेल्या ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ या मालवाहू जहाजावर रविवारी पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास इराणने प्रक्षेपकाद्वारे हल्ला केला. या जहाजावर पुण्याचे हेरंब करमरकर हे ‘थर्ड इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होते. हल्ल्यामुळे इंजिन रुमला भीषण आग लागली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्राणघातक हल्ल्याच्या अवघ्या 41 मिनिटांपूर्वी हेरंब यांचे त्यांच्या पुण्यातील कुटुंबीयांशी बोलणे झाले होते. आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार करत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांची ही सागरी मोहीम 3 महिन्यांची होती आणि ते लवकरच भारतात परतणार होते. गॅलेक्सी जहाजावरील 24 कर्मचाऱ्यांपैकी (ज्यामध्ये 11 भारतीय होते) 23 जणांची ‘रॉयल नेव्ही ऑफ ओमान’ने लाइफबोट्सच्या साहाय्याने सुरक्षित सुटका केली. मात्र, हेरंब बेपत्ता होते. मंगळवारी त्यांच्या कंपनीकडून अधिकृतपणे मृत्यूची पुष्टी करण्यात आली. इतर व्यापारी जहाजांवर हल्ले संयुक्त अरब अमिरातीची (UAE) ‘अल बाहिया’ आणि ‘मोम्बासा’ ही व्यापारी जहाजे ओमानच्या जलक्षेत्रातून जात असताना इराणने 2 क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे त्यांच्यावर हल्ला केला. या दोन्ही जहाजांवरील 46 पैकी 30 खलाशी भारतीय होते. ‘अल बाहिया’वरील 12 भारतीयांपैकी 1 जणाचा मृत्यू झाला असून 1 जखमी आहे. तर ‘मोम्बासा’वरील 18 पैकी 9 भारतीय जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हिंसक घटनांची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे उपप्रमुख मोहम्मद जवाद होसेनी यांना बोलावून भारताने कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. यूएईमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून जखमी भारतीय खलाशांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवली जात आहे. भारताने पश्चिम आशियात तातडीने हिंसाचार थांबवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील या वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय जलवाहतूक आणि मुक्त व्यापार अत्यंत असुरक्षित झाला आहे. निष्पाप खलाशांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या एका तरुण अभियंत्याला प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, आखातातील हे युद्ध लवकर संपुष्टात येण्याची आशा सध्या तरी धूसर दिसत आहे
Source link
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्याच्या इंजिनिअरचा दुर्दैवी अंत:होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर भीषण हल्ले