Headlines

एनडीए अन् अर्थमंत्रिपदाच्या चर्चा निव्वळ अफवा:मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट, आम्ही सर्व शरद पवारांसोबतच- जयंत पाटील




माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा झाला आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली. माझी त्यांच्याकडे इतर कोणतीही कामे नव्हती. आम्ही सर्व जण खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबतच आहोत. त्यामुळे एनडीए किंवा मला अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी घेतलेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते, त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. जयंत पाटील यांना महायुती सरकारमध्ये अर्थमंत्रीपद दिले जाणार असल्याच्या वावड्यांवर त्यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो, तो अधिकारही तुम्ही हिरावून घेत आहात. मी कसलाच विचार केलेला नाही, तुम्ही लोकांनीच फार विचार केला आहे. माणूस पक्षातून गेला तरच अशा चर्चांना अर्थ असतो ना? आम्ही सर्व शरद पवारांसोबत आहोत. अशा खोट्या चर्चा ऐकून वाईट वाटते.
तटकरे-पटेल यांच्याशी भेट नाही जयंत पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हॉलमध्ये एकटाच बसून होतो. मुख्यमंत्री बराच वेळ अंतर्गत बैठकीत व्यस्त होते. ते बाहेर आल्यावर माझी त्यांच्याशी 10 ते 15 मिनिटे चर्चा झाली. ते आत कोणासोबत बैठक घेत होते, याची मला कल्पना नाही. तटकरे किंवा पटेल यांच्याशी माझी तिथे कोणतीही भेट झालेली नाही. त्यामुळे पक्षात विलीनीकरणाची चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर या प्रकारची चर्चा कोणासोबतही झालेली नाही, त्यामुळे ती थांबवली आहे असे म्हणण्याची गरजच नाही. मुख्यमंत्र्यांना का भेटले? जयंत पाटील म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्षांना अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय चुकीचा असून यात मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरीत्या लक्ष घालावे, हीच माझी मागणी होती. हा माझ्या मतदारसंघातील अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. यापूर्वी मी यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते दिल्ली दौऱ्यावर असल्याने भेट होऊ शकली नाही. म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विनोद तावडे यांच्यासोबतच्या कॉफीचे गुपित अधिवेशनादरम्यान भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी झालेल्या भेटीवरही त्यांनी पडदा टाकला. विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना ओबेरॉय हॉटेलच्या वरच्या मजल्यावर फायनान्सची एक बैठक होती. तिथे खासदार सुप्रिया सुळे यांनी मला दुसऱ्या एका पक्षीय कारणासाठी बोलावले होते. तिथे योगायोगाने विनोद तावडेही बसलेले होते. त्यामुळे आम्ही सोबत कॉफी घेतली, यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असा खुलासा त्यांनी पुन्हा एकदा केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *