Headlines

पुण्यातील कात्रज ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन:प्रशांत सावंत निघाला आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कर, सावंतच्या पोलिस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ




कात्रज परिसरातून तब्बल 5.79 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी प्रशांत सुरेश सावंत (वय 38, रा. येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतने हा अमली पदार्थांचा साठा दिल्ली येथून आणला होता. एका नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून तो हा साठा बंगळुरू येथे देण्यासाठी निघाला होता. कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील नवीन उड्डाणपुलाखाली त्याला 8 जुलै रोजी पकडण्यात आले. बेनी असे या नायजेरियन महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सावंतकडून 2 किलो 895 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी), एक मोबाईल आणि कपड्यांची बॅग असा एकूण 5 कोटी 79 लाख 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथक-1 चे पोलिस हवालदार अतुल क्षिरसागर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सावंतला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे ते दिल्ली हे सुमारे 1300 किलोमीटर अंतर असल्याने, दिल्लीत सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही. या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय टोळीच्या साखळीचा छडा लावण्यासाठी आरोपीला सोबत घेऊन दिल्ली आणि बंगळुरू येथे तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सावंत हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. बंगळुरूच्या अमृताहल्ली पोलिस ठाण्यात त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच, पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलिस ठाण्यांमध्ये त्याच्यावर विविध प्रकारचे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. जप्त केलेल्या अमली पदार्थांचे व्यावसायिक प्रमाण विचारात घेता गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आंतरराज्यीय साखळीचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे नमूद करत, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. गिरम यांनी सावंतच्या पोलिस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अमर ननावरे यांनी पोलिस कोठडी वाढवण्याबाबत युक्तिवाद केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *