![]()
ऑनलाइन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवण्याच्या नादात ठाण्यातील एका २६ वर्षीय तरुणाने तब्बल १.३६ कोटी रुपये गमावले आहेत. सायबर भामट्यांनी अत्यंत शिताफीने जाळे विणून या तरुणाची फसवणूक केली असून याप्रकरणी रविवारी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑक्टोबर २०२४ ते ३० जून २०२६ या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. पोलिसांनी ३ वेबसाइट्स आणि विविध बँक खातेदारांसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा आणि संबंधित वेबसाइट्सच्या ‘डिजिटल फूटप्रिंट्स’चा सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी सुरुवातीला डिजिटल माध्यमांवरून (टेलिग्राम/व्हॉट्सॲप) त्याच्याशी संपर्क साधला. त्याला ऑनलाइन गेम खेळून आणि त्यात गुंतवणूक करून कमी वेळात दुप्पट-तिप्पट परतावा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले. भामट्यांनी त्याला तीन वेगवेगळ्या वेबसाइट्सवर नोंदणी करायला लावली. विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्याला काही रक्कम परतावा म्हणून देण्यात आला असावी. त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत तरुणाने भामट्यांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहारांद्वारे तब्बल १.३६ कोटी रुपये जमा केले. जेव्हा त्याने आपली मूळ रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेबसाइट चालकांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच सर्व संपर्क तोडला. अनधिकृत लिंकवर क्लिक नको कोणतीही अनोळखी व्यक्ती किंवा वेबसाइट जेव्हा बाजारातील दरापेक्षा अवाजवी परताव्याची हमी देते तेव्हा तो १००% घोटाळा असतो. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू नयेत. ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी.
Source link
ऑनलाइन गेमिंगचा नाद भोवला:ठाण्यात तरुणास दीड कोटीचा गंडा; 3 संकेतस्थळे, विविध बँक खातेदारांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा