![]()
उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या नैराश्यातून कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता; मात्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचे समजल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदाने नुकतीच वाणिज्यशाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तिला पुढे ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन’ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. बारावीची परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या बहिणीसोबत नंदुरबार येथे मामाच्या गावी सुट्ट्यांसाठी गेली होती. ॲडमिशन पोर्टल बंद अन् नैराश्याची सुरुवात सुट्ट्या संपवून १४ जून रोजी अक्षदा जेव्हा कल्याणला परतली, तेव्हा तिने मुंबई विद्यापीठाच्या ॲडमिशन प्रक्रियेची माहिती घेतली. मात्र, तोपर्यंत BCA अभ्यासक्रमासाठीचे ऑनलाइन ॲडमिशन पोर्टल बंद झाले होते. प्रवेशाची मुदत उलटून गेल्याचे समजताच अक्षदाला मोठा धक्का बसला. आपल्याला आता यावर्षी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, या विचाराने ती प्रचंड तणावाखाली आणि नैराश्यात गेली. रुग्णालयाचा खर्च न झेपल्याने मुंबईत हलवले याच नैराश्यातून अक्षदाने १८ जून रोजी घरातच उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळाने तिची प्रकृती बिघडू लागल्याने तिने स्वतःच आईला विष प्यायल्याची माहिती दिली. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, खासगी रुग्णालयाचा वाढता खर्च उचलणे तिच्या पालकांना शक्य नव्हते. त्यामुळे पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील जे. जे. या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. २८ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू जे. जे. रुग्णालयात तब्बल १० दिवस अक्षदाची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, तिची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती आणि अखेर २८ जून रोजी तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी ३० जून रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका छोट्याशा चुकीमुळे आणि वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे एका होतकरू तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या तरुणीच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी समोर आली. हेही वाचा.. मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात:मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले; पळणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलं मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री एका मद्यधुंद टँकरचालकाने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चालकाला स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सविस्तर वाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली:ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; सर्व नियोजित कार्यक्रम रद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांतील सततची धावपळ यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर कायम:मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार, कोकणात रेड अलर्ट; विदर्भातही पावसाचा जोर राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला आहे, मात्र नागरी भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई शहरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीमधील शाळांना प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली आहे. सविस्तर वाचा
Source link
ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपली:ॲडमिशन हुकल्याने कल्याणमधील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या