Headlines

महायुतीत विनायक मेटेंच्या पश्चात 'शिवसंग्राम'ची उपेक्षा:अद्याप स्वबळाचा निर्णय नाही, पण…; कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास थोपवणे अवघड जाईल- ज्योती मेटे




शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या हयातीत पक्षाला महायुतीत जो सन्मान आणि वाटा मिळत होता, तो आता त्यांच्या पश्चात मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि तीव्र नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे थेट परिणाम पाहायला मिळतील, असा इशारा ज्योती मेटे यांनी दिला आहे. ज्योती मेटे म्हणाल्या की, महायुतीचा एक प्रामाणिक घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामने संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिका आणि नगर पालिका निवडणुकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्रितपणे काम केले. मात्र, एवढे सहकार्य करूनही सध्या शिवसंग्रामच्या वाट्याला केवळ उपेक्षाच येत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात स्थिरस्थावर करण्यासाठी महायुतीने पक्षाला सन्मानजनक स्थान दिले पाहिजे, ही खंत आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडेही बोलून दाखवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीने वेळीच योग्य वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या संतापलेल्या मानसिकतेला थोपवणे कठीण जाईल, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीने आश्वासने पाळली नाही बीडमधील स्थानिक राजकारणाचा दाखला देत ज्योती मेटे यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. बीड नगरपालिकेत आम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत एकत्र लढलो, परंतु त्यावेळी आम्हाला जी आश्वासने देण्यात आली होती, त्यांची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नाही, अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली. आता आगामी जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. आम्ही अद्याप स्वबळावर लढण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नसला, तरी आम्हाला वेगळा विचार करण्यास भाग पाडू नका, असे त्यांचे म्हणणे आहे. महायुतीने सन्मानजनक वाटा द्यावा शिवसंग्रामने विनायक मेटे यांना गमावले असले, तरी आपली ताकद गमावलेली नाही, असे सांगत ज्योती मेटे म्हणाल्या की, विस्थापितांना संधी देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावर ठाम आहे. महायुतीने सहयोगी पक्षांसाठी धोरणे ठरवताना शिवसंग्रामच्या या ताकदीचा आणि अस्तित्वाचा गांभीर्याने विचार करावा आणि सन्मानजनक वाटा द्यावा, असे नम्र आवाहनही त्यांनी शेवटी केले. हे ही वृत्त वाचा ‘उबाठा’त फक्त उद्धव ठाकरे-संजय राऊतच उरणार:मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर सोबत कोण राहणार, संजय केनेकरांचा ठाकरेंना रोकडा सवाल उबाठा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचे दिसत असून, राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील, आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पक्ष सोडतील, असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *