Headlines

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंचे फडणवीसांना खरमरीत पत्र, तर राऊतांचा 'मौत के सौदागर' म्हणत घणाघात




साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गंभीर घटनेवर भाजपचे मुंबईतील आमदार अमित साटम हे हसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून भाजपच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपला ‘मौत के सौदागर’ म्हणत लक्ष्य केले आहे. राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना खरमरीत पत्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून भाजप नेत्यांच्या वागणुकीवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मौनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पत्रातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे: सत्तेचा माज आणि असंवेदनशीलता: “केंद्रातील भाजप नेत्यांना सत्तेचा माज आला आहे आणि हा संसर्ग आता महाराष्ट्रातही पसरला आहे. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर ‘फिदीफिदी’ हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही, हे अत्यंत संतापजनक आहे.” ‘Power tends to corrupt…’: राज ठाकरेंनी ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ या सुप्रसिद्ध वाक्याचा दाखला देत, भाजपचे सध्याचे नेते या वाक्याचे आदर्श उदाहरण ठरत असल्याचा टोला लगावला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास: महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या राजकारणात जमीन-अस्मानाचा फरक होता. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार किंवा प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी कधीही स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवर पांघरूण घातले नाही. मात्र, आता आपण उत्तरेकडील मागास राज्यांची बरोबरी करत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. फडणवीसांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह: “देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील आहेत असे वाटत होते. पण, तुमचे मंत्री आणि नेते रोज बेताल विधाने करत असताना, असंवेदनशीलता दाखवत असताना तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही. तुम्ही फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा ‘भाऊ’ अशी प्रतिमा बनवू नका.” राजीनाम्याची मागणी: अशा बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ‘मौत के सौदागर, मुंबई भाजपचा क्रूर चेहरा’; संजय राऊतांचा हल्लाबोल राज ठाकरेंनंतर शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनीही एक्स (X) खात्यावर पोस्ट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. राऊत यांनी अमित साटम यांचा फोटो शेअर करत “मौत के सौदागर, मुंबई बीजेपी का क्रूर चेहरा” असा मजकूर लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. निष्पाप मुंबईकरांचे जीव जात असताना, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधीच अशी बेपर्वाई आणि असंवेदनशीलता दाखवत असल्याने राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली आहे. नेमका वाद काय आहे? साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर भर पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला. या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटनेबाबत बोलताना किंवा त्यासंदर्भातील संवादादरम्यान भाजपचे आमदार अमित साटम हे हसताना दिसले. एका व्यक्तीचा नाहक बळी गेलेला असताना लोकप्रतिनिधीने असे वर्तन केल्याने सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. संबंधित बातमी वाचा… मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, 4 अधिकाऱ्यांचे निलंबन मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा… साकीनाका मॅनहोल दुर्घटनेत मोठा खुलासा:सुरक्षिततेसाठी मॅनहोल उघडला, पण नियमच पाळले नाहीत; पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. ही दुर्घटना मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी जाळी बसविण्याचे काम सुरू असतानाच घडली, मात्र कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्यात आले नाही, अशी कबुलीच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. सविस्तर वाचा… साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला. “मुंबईच्या महापौरांना मुंबईकरांची नाही, फक्त बांग्लादेशींची काळजी आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *