![]()
सध्या राज्यभरात पावसाचा जोर वाढत असताना, पुणे शहरातील एक अत्यंत ‘अजब’ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना, रस्त्याच्या कडेला दुभाजकांवरील झाडांना एका टँकरद्वारे पाणी घातले जात असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावर प्रचंड टीका करत ‘ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे’ असा संताप व्यक्त केला. मात्र, या प्रकरणावर महापालिका आणि ‘महामेट्रो’ने खुलासा करत या मागचे नेमके कारण स्पष्ट केले आहे. नेमका प्रकार काय? व्हिडिओ कुठला? पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. याच दरम्यान, कर्वे रस्त्यावरील (पौड रस्ता) नळस्टॉप मेट्रो स्टेशनजवळील दुभाजकावर एक कर्मचारी टँकरमधून झाडांना पाणी घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भरपावसात झाडांना पाणी घालण्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनीही महापालिकेला धारेवर धरले. त्यांनी X (ट्विटर) वर व्हिडिओ शेअर करत लिहिले, “वरून पाऊस पडत असताना टँकरने झाडांना पाणी देणारी पुणे महानगरपालिका ही जगातली पहिली मनपा असेल! अरे काय धंदे लावलेत.. ओरबाडायलाही काही मर्यादा असावी की नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळगा!” दुसरीकडे, विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली होती. प्रशासनाचा खुलासा: “तो खर्च पालिकेचा नाही, मेट्रो ब्रीजमुळे पाणी पोहोचत नाही” या व्हिडिओवरून महापालिकेवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर, पुणे महापालिका आणि ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी माध्यमांना सांगितले की, कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गाच्या खालच्या दुभाजकाची जबाबदारी ‘महामेट्रो’ची आहे. महापालिकेने तिथे झाडांना पाणी घातलेले नाही. महामेट्रोने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडून हे पाणी घातले जात आहे. तर ‘महामेट्रो’चे संचालक चंद्रशेखर तांबवेकर म्हणाले की, संबंधित ठिकाणच्या देखभालीची आणि सुशोभीकरणाची जबाबदारी एका खासगी जाहिरात कंपनीची आहे. टँकरद्वारे पाणी देण्याच्या प्रक्रियेशी महामेट्रो किंवा महापालिकेचा कोणताही संबंध नसून, त्यासाठी एक रुपयाही खर्च केला जात नाही. हा सर्व खर्च संबंधित जाहिरात कंपनी स्वतःच्या खिशातून करते. पावसाचे पाणी पोहोचत नाही मेट्रोच्या उड्डाणपुलाचा स्पॅन मोठा असल्यामुळे (पूल थेट वर असल्यामुळे) त्या भागातील दुभाजकात थेट पावसाचे पाणी पडत नाही. तसेच, मेट्रो ट्रॅकवरील पावसाचे पाणी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’द्वारे स्टेशनमध्ये साठवले जाते, ते दुभाजकात सोडले जात नाही. त्यामुळे, पाऊस असूनही त्या झाडांना टँकरने पाणी देणे आवश्यक असते, असा खुलासा तांबवेकर यांनी केला. एसटीपी (STP) चे पाणी का वापरले नाही? शहरातील उद्याने आणि झाडांना मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या (STP) पाण्याचा वापर करावा, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. असे असताना, या ठेकेदाराने बोअरवेलच्या पाण्याचा वापर का केला? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. हेही वाचा.. गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा पर्यटकांची प्रतीक्षा संपली: लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा
Source link
पुणे मनपाचा अजब कारभार:भरपावसात रस्त्याच्या दुभाजकातील झाडांना टँकरने पाणी; व्हिडिओ व्हायरल होताच उठली टीकेची झोड