![]()
औंढा नागनाथ पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेत झालेल्या ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी ता. १६ सकाळी आकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लेखा विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीनंतर सविस्तर अहवाल सादर केला असून यामध्ये चार कर्मचाऱ्यांसह गटविकास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणे अपेक्षीत असतांना मागील सहा महिन्यापासून प्रशासनाकडून टाळाटाळ चालविली जात असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, सेनगाव तालुक्यात याच प्रमाणे गैरव्यवहार उघड झाला होता. त्यामध्ये दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल झाले. मात्र औंढा नागनाथमध्ये दुजाभाव का असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी तीन वेळा पंचायत समितीला पत्र दिले मात्र सीईओंच्या या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यानंतर मागील पंधरवाड्यात अंतिम पत्र दिले. त्या पत्रालाही केराची टोपली दाखविण्याचे धाडस पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. याप्रकरणात दोषींवर गुन्हा दाखल करावा तसेच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी गुरुवारी ता. १६ सकाळी आकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, औंढा नागनाथ तालुकाप्रमुख माऊली झटे, बबनराव इधारे, शंकर घुगे, गणेश शिंदे, उद्धवराव सावंत, विष्णू जाधव, तुकाराम गायकवाड, प्रवीण देवकर, बाळू गारकर, प्रमोद चापके, प्रमोद डोमे, बाळासाहेब मांडे, बबनराव मांडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी मानले जात असतांना त्यांच्या आदेशालाच कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आलेली केराची टोपली शंका निर्माण करणारी आहे. सीईओंची शिस्त कुठे कमी पडत आहे असा सवाल आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केला.
Source link
औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन