![]()
सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमात रविवारी सायंकाळी ‘सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या’ वतीने ‘सूरसंध्या’ या सांस्कृतिक गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचा हलकासा शिडकावा आणि हवेतील गारवा अशा आल्हाददायक वातावरणात ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गाणे सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है’ यांसारख्या सदाबहार गाण्यांमुळे आश्रमातील आजी-आजोबांसह सर्वच रसिक चाळीस वर्षे जुन्या आठवणींत रमून गेले होते. या संगीत मैफलीचा शुभारंभ सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमात ‘तूने ओ रंगीले कैसे जादू किया’, ‘मेरी किस्मत में तू नहीं शायद’, ‘जिंदगी के सफर में’, ‘तेरा साथ है कितना प्यारा’ अशा एकापेक्षा एक सरस अशा २२ अविस्मरणीय हिंदी गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीना गायकवाड यांनी ‘सत्यम शिवम् सुंदरम’ हे गीत सादर केले. त्यानंतर गायक प्रतिमा बेनगी, रवींद्र शिंदे, राजाराम चिंचोळकर, डॉ. प्रसन्न गव्हाणे, मनीषा मुन्नोत, अपर्णा भोगे, सूर्यकांत घाडगे, महेंद्र भुद्रे आणि संगीता पुकाळे आदी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण मैफल चैतन्यमय करून टाकली. ब्रिजधाम आश्रमाचे प्रमुख ब्रिजमोहन फोफलीया यांनी या सोहळ्याचे नेटके आयोजन केले होते.
Source link
कभी- कभी मेरे दिल मे खयाल आता है….:ब्रिजधाम आश्रमात हिंदी गाण्यांची मैफल