Headlines

करमाळ्यात पेशवेकालीन श्री खोलेश्वर महादेव मंदिर:श्रावणात कार्यक्रमांची रेलचेल; भाविकांची गर्दी‎




करमाळा शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारी अनेक पुरातन मंदिरे आजही शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देत उभी आहेत. राजे राव रंभा निंबाळकर यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आलेल्या या मंदिरांपैकी किल्ला विभागातील श्री खोलेश्वर महादेव मंदिर हे पुरातन वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून ओळखले जाते. भव्य, आखीव-रेखीव रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. करमाळा शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मंदिरात दररोज दोन वेळा आरती केली जाते. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री खोलेश्वर महादेवाच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. हा रथ लाकडी असून त्याची रचना अत्यंत सुबक आणि नक्षीकामाने सजलेली आहे. या रथाची रचना श्रीदेवीमाळ येथील कमलादेवी मंदिरातील दगडी रथाशी साधर्म्य दर्शवते. श्री खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात येते. तसेच महाशिवरात्रीनंतर माघ महिन्यातील तृतीयेला नंदीची मिरवणूक काढण्याचीही परंपरा आहे. लिंगायत कोष्टी समाजाच्या वतीने श्रावण महिन्यात येथे शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे. सप्ताहाच्या काळात मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन श्री खोलेश्वर आरती मंडळाची स्थापना केली आहे .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *