![]()
शिक्षक, तलाठी किंवा ग्रामसेवक असो, गावपातळीवर काम करणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करावे. आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून गावाला एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले. लासूरगाव येथे गावाकडे चला अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. येथील जिल्हा परिषदेच्या पीएमश्री शाळेत आयोजित वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शाळेतील ॲस्ट्रॉनॉमी लॅब, आयडियल सेंटर, कॉम्प्युटर लॅब आणि नूतन ग्रंथालयाची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याध्यापक सुरेश राऊत व शिक्षक वृंदाचे कौतुक केले. सोळंके पुढे म्हणाले की, लासूरगावच्या पीएमश्री शाळेने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. शिक्षकांनी आता दरमहा पालक मेळावे घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना द्यावी. तसेच, शाळेच्या नादुरुस्त खिडक्या आणि अपुऱ्या शिक्षकांचा प्रश्न मी नोंदवून घेतला असून, तो लवकरच मार्गी लावला जाईल. ” ग्रामस्थांना विश्वास देताना ते म्हणाले, माझ्याकडे तक्रारी घेऊन येण्यापेक्षा अडचणी घेऊन या; मी सदैव तुमच्या संपर्कात राहून काम करेन. याप्रसंगी गटविकास अधिकारी जायभाये, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई तांबे, पंचायत समिती सदस्य अर्चनाताई शेलार, राहुल पाटील शेळके, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहींज, उपसरपंच रितेश मुनोत, वसंतराव हुमे, रणजित देशमुख, राजेंद्र संगेकर, तातेराव गोंडे, आदिनाथ वाघुडे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश राऊत यांनी केले, तर शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी अपुऱ्या शिक्षक संख्येचा प्रश्न मांडला. सूत्रसंचालन महेंद्र देशमुख यांनी. घरकुल लाभार्थी महिलेच्या घरी केले जेवण जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके गावात आगमन झाल्यावर देवी दाक्षायाणी मातेचे दर्शन घेतले. घरकुल योजनेच्या लाभार्थी शोभाबाई बाळू नेटके यांच्या घरामध्ये चटणी-भाकरीचे जेवण केले. एवढेच नव्हे तर, रात्री उशिरापर्यंत मंदिरात टाळ हाती घेऊन ते भजनात तल्लीन झाले आणि भक्तनिवासातच मुक्काम केला.
Source link
कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून गावे होणार आदर्श:लासूरगाव शाळेत वासुदेव सोळंके यांच्याकडून शिक्षकांचा गौरव