![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, महिला आरक्षण, अमरावती आग प्रकरण आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या सक्तीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. यापूर्वी 7 ऑगस्ट रोजी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना 5 हजार 29 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. त्यामुळे दोन टप्प्यांत आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 115 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र आहेत, त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाईल. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिला आरक्षणावरून काँग्रेसवर टीका महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते सातत्याने बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असून, त्यावेळी विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी मतदारसंघ पुनर्रचना आणि जनगणनेशी संबंधित बाबींचा विचार करण्यात आला होता, असे फडणवीस यांनी सांगितले. कोविडमुळे जनगणना पुढे गेल्याने या प्रक्रियेलाही विलंब झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. 2029 मध्ये महिलांना आरक्षण देण्याचा मोदी सरकारचा निर्धार असून, कोणत्याही परिस्थितीत महिलांना आरक्षण मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांनी यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा दिला होता, असा दावा करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याची टीका त्यांनी केली. अमरावती आगीप्रकरणी जबाबदारांवर कारवाई अमरावतीतील आगीच्या घटनेवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात जे कोणी दोषी किंवा जबाबदार आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी शिकण्यासाठी आणखी संधी, मुदतवाढही देणार- फडणवीस महाराष्ट्रातील ऑटो, टॅक्सी आणि कॅबचालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. ज्यांना मराठी भाषा येत नाही, त्यांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून अधिक संधी आणि आवश्यक मुदतवाढ देण्यात येईल, असा दिलासा फडणवीस यांनी दिला. त्यामुळे भाषेची अडचण असणाऱ्यांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा.. अमरावतीमध्ये रुग्णालयाच्या बाल युनिटमध्ये आग:3 नवजात बालकांचा मृत्यू, 39 बालके दाखल होती; व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (NICU) सोमवारी पहाटे सुमारे 3:30 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. सहा मुलांना पुढील उपचारांसाठी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली. त्यानंतर धूर पसरला. त्यावेळी NICU मध्ये 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सविस्तर वाचा
Source link
काँग्रेस आणि मविआकडून महिला आरक्षणावरून बुद्धीभेद:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल