![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मदतीतील विसंगतीवर बोट ठेवत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारची ‘हातचलाखी’ उघड शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपये मदतीची मागणी असताना, सरकार केवळ ५ हजार रुपये देऊन त्यांची बोळवण करत असल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत निदर्शनास आणून दिला आहे. राज्य सरकार एकीकडे ५ हजार रुपये देण्याचा गाजावाजा करत असले, तरी दुसरीकडे एप्रिल महिन्यापासून कृषी सन्मान निधीचे दोन हप्ते (जे ४ हजार रुपये होतात) अद्याप प्रलंबित ठेवले आहेत. म्हणजे एका हाताने ५ हजार रुपये द्यायचे आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांच्या हक्काचे ४ हजार रुपये रोखून धरायचे, हा प्रकार संतापजनक असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मदतीच्या नावाखाली ‘सावकारी’ आणि ‘धूळफेक’ मिळणाऱ्या ५ हजारांमधून हक्काचे ४ हजार रुपये अडकले असल्याने, ही सरकारची निव्वळ धूळफेक आणि हातचलाखी असल्याची घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक करणे ही वृत्ती एखाद्या सावकारालाच शोभते, असा टोलाही त्यांनी लगावला. या भूमिकेवरून हे सरकार बळीराजाच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे, याचा स्पष्ट अंदाज येतो, असेही ते म्हणाले. ‘सरकारला वठणीवर आणणारच!’ मदत देण्याच्या नावाखाली जर सरकार शेतकऱ्यांची ‘पाकीटमारी’ करणार असेल आणि मदत देताना हात आखडता घेणार असेल, तर अशा असंवेदनशील सरकारला वठणीवर आणावेच लागेल, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण आणि आपला पक्ष ही भूमिका खंबीरपणे पार पाडू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 5 हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा, अंबादास दानवेंचे सरकारला थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत, त्यांनी सांगितलेल्या मंत्र्याच्या खात्यात शिवसैनिक ५ हजार रुपये जमा करतील आणि त्या रकमेत घरचा किराणा, मुलांचे कपडे, घराची सारवासारव, मिठाई, दिव्यांचे तेल, फटाके, बहिणीची ओवाळणी आणि पत्नीसाठी साडी अशा दिवाळीच्या गरजा पूर्ण करून दाखवाव्यात, असे म्हटले. हे सर्व पाच हजारांत करून दाखवल्यास आणखी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ पर्यंत वाढवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठवाड्यातील अवैध पाणी उपसा जोडण्या तोडण्यासह दुष्काळात शेतकऱ्यांकडील चारा हमीभावाने खरेदी करण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ————— हेही वाचा.. शेतकऱ्यांना 5 हजारांच्या मदतीने काय होणार?:दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख द्यायला पैसे का नाहीत? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल “महाराष्ट्रातील बळीराजा आज अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांत सापडून होरपळत आहे. शेतकऱ्यांची मागणी प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीची असताना, सरकारने केवळ 5 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. 5 हजार रुपयांत आजच्या महागाईत खताचे दोन पोतेही येत नाहीत, मग शेतकऱ्याचा संसार कसा चालणार? जनतेचा विरोध असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे 1 लाख कोटी रुपये उपलब्ध आहेत, मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपयांचे साहाय्य द्यायला तिजोरीत खडखडाट का? सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये,” असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
दुष्काळी मदतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:म्हणाले- एकीकडे 5 हजार द्यायचे आणि दुसरीकडे 4 हजार रोखून धरायचे; ही धूळफेक, हातचलाखी सरकारला शोभते का?