![]()
कारागृहातील बंदी बांधवांनी यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीपासून श्री गणेशमूर्ती साकारल्या आहेत. कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामागे बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांच्यातील सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश आहे. ‘प्रेरणापथ’ या उपक्रमांतर्गत बंदी बांधवांना गणेशमूर्ती निर्मितीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश त्यांच्या कलागुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे, प्रायश्चित्ताची भावना सकारात्मक कृतीत रूपांतरित करणे आणि त्यांना समाजाशी पुन्हा जोडणी साधण्यास मदत करणे हा आहे. या प्रशिक्षणातून व्यावसायिक कलाकारांच्या कलाकृतींना लाजवतील अशा सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदी बांधवांना मूर्तीकलेचे मार्गदर्शन केले. कारागृह सुधार सेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, महानिरीक्षक योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ आणि अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी समाजाला आवाहन केले आहे की, बंदी बांधवांनी साकारलेल्या या गणेशमूर्ती भक्तिभावाने स्वीकारून आपल्या घरी प्रतिष्ठापना करावी. या उपक्रमामुळे बंदी बांधवांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्यातील सकारात्मक परिवर्तनाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची विक्री गायत्री क्लिनिक, खडक माळ, राष्ट्रभूषण चौक, शिवाजी रोड, पुणे येथील स्टॉलवर सुरू आहे. शाडू मातीपासून तयार केलेल्या या मूर्ती पर्यावरणपूरक असून, नागरिकांनी त्यांची खरेदी करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांनी केले आहे. या उपक्रमाचा मुख्य संदेश हा आहे की, ‘बाप्पा’च्या मूर्तीसोबत परिवर्तनाची आशाही घरोघरी पोहोचावी. समाजातील नागरिकांनी पुढे येऊन बंदी बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
कारागृहातील कैदी साकारत आहेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती:परिवर्तनाचा संदेश देत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न