Headlines

ऑनलाइन गेमिंग फ्रॉड प्रकरणी ईडीची मोठी कारवाई:नागपूर, गोंदिया, अहमदाबादमध्ये छापे; कोट्यवधींची संपत्ती जप्त




अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) नागपूर उप-क्षेत्रीय कार्यालयाने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग फसवणूक प्रकरणाचा तपास तीव्र करत मोठी कारवाई केली आहे. आरोपी अनंत नवरत्न जैन उर्फ सोंतू जैन आणि त्याच्या सहकाऱ्यांशी संबंधित नागपूर, गोंदिया आणि अहमदाबादमधील एकूण १२ ठिकाणांवर १८ ऑगस्ट २०२६ रोजी धडक छापेमारी करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) ही कारवाई करण्यात आली असून, यादरम्यान ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. “डायमंड एक्सचेंज.काॅम’, “वोल्फ ७७७.काॅम’ आणि “वर्ल्ड ७७७.काॅम’ सारख्या फेरफार केलेल्या ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून हा फसवणुकीचा गोरखधंदा चालवला जात होता. या शोध मोहिमेत संशयितांच्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे हाती लागली आहेत. कारवाईदरम्यान ३० लाख ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, अचल संपत्तीशी संबंधित अनेक आक्षेपार्ह आणि महत्त्वाचे कागदपत्रे देखील मिळाले आहेत. याशिवाय, १०० हून अधिक बँक खाती, म्युच्युअल फंड आणि शेअर्स गोठवण्यात आले असून, या सर्वांचे एकत्रित मूल्य सुमारे ५ कोटी रुपये आहे. तसेच, २ बँक लॉकर फ्रीज करण्यात आले असून सुमारे १ कोटी ७० लाख रुपये मूल्य असलेल्या ३ महागड्या लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून काळा पैसा कमावणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास ईडीकडून कसून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *