![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तीमय वातावरणात ‘पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी’ हा आगळावेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी वारकरी बनत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, संस्कारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण तसेच विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात विणा, मुखी विठ्ठलनाम आणि पावलोपावली हरिनामाचा गजर अशा भक्तिरसात न्हालेल्या दिंडीने परिसर भक्तिमय बनला होता. दिंडीतून “झाडे लावा-झाडे जगवा, एक बाळ-एक झाड, पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी अशा घोषणांद्वारे पर्यावरण संरक्षण, संस्कार आणि शिक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. सरस्वती विद्यालयातून निघालेली ही दिंडी मोहिनीनगर मार्गे केडगाव देवी प्रांगणात पोहोचली. तेथे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी फुगडीचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी आकर्षक रिंगण साकारत पर्यावरण संवर्धनाची गीते सादर केली. भक्ती आणि संस्कारांचा संगम अनुभवत परिसर विठ्ठलमय झाला. यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले, महाराष्ट्राची संतपरंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये नव्या पिढीत रुजावीत, या हेतूने दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. शाळा कोणत्याही माध्यमाची असो विद्यार्थ्यांना संस्कारांचे बाळकडू देणे ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची जबाबदारी आहे. सरस्वती विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीची जपणूकही केली जाते. या दिंडी सोहळ्याप्रसंगी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेविका कमल कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक संभाजी पवार, प्रा. डॉ. रविंद्र चोभे, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, अवी साठे, सुमन पाटील, सुमन कदम, सुमन गावडे, लंका आव्हाड, प्रियंका सातपुते, किसनाबाई बनकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहीम राबवत स्वच्छतेचा संदेश दिंडीचा समारोप केडगाव देवी प्रांगणात भक्तीपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. समारोपानंतर विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विठ्ठलभक्ती, संतसंस्कार, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या दिंडी सोहळ्याने उपस्थितांच्या मनात भक्तीचा, संस्कारांचा आणि समाजसेवेचा दीप प्रज्वलित केला.
Source link
केडगावात 700 विद्यार्थ्यांनी दिला संस्कार अन् पर्यावरणाचा प्रभावी संदेश