![]()
पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (28 जून) महत्त्वपूर्ण कारवाई केली. केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोन्ही मुख्य आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले. 18 जून रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी ‘सीन रीक्रिएशन’ आयोजित केले आहे. केतनला कोणत्या कड्यावरून 400 फूट खोल दरीत ढकलण्यात आले, याचा तपास केला जात आहे. या कारवाईसाठी किल्ल्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरुवातीला सिया गोयलने हा अपघात असल्याचे सांगत केतनचा पाय घसरल्याचा दावा केला होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हत्येचा छडा लावला. तपासात समोर आले की, सिया आणि चेतनने अवघ्या 45 मिनिटांत केतनच्या हत्येचा कट रचला होता. 18 जून रोजी सकाळी गडावर पोहोचल्यानंतर पूर्वनियोजित योजनेनुसार, सियाच्या इशाऱ्यावरून चेतनने केतनला मागून खोल दरीत ढकलून दिले होते. आज लोहगड किल्ल्यावरील ज्या कड्यावरून केतनला ढकलण्यात आले, त्याच ठिकाणी दोन्ही आरोपींना समोरासमोर उभे करून चौकशी केली जात आहे. हत्येचा कट कसा अमलात आणला, घटनास्थळी कोण कुठे उभे होते आणि हत्येनंतर त्यांनी काय केले, याबद्दल पोलिसांकडून प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती घेतली जात आहे. या हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुरावे भक्कमपणे गोळा करत आहेत, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा होईल.
Source link
केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या 'सीन रीक्रिएशन'साठी घटनास्थळी दाखल