Headlines

'कॉक्रोच जनता पार्टी'ला अण्णा हजारेंचा पाठिंबा:म्हणाले – नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला




सोशल मीडियावर अल्पावधीत तुफान लोकप्रिय झालेली आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना आव्हान देऊ पाहणारी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) सध्या वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात आहे. या पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि संकेतस्थळांमार्फत बंदी घालण्याचे प्रयत्न झाले असतानाच, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या चळवळीला पाठबळ दिले आहे. “नाव जरी अजब असले, तरी या पक्षाच्या मागे देशातील तरुण उभा राहिला आहे, हे महत्त्वाचे आहे,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही एक उपहासात्मक ऑनलाइन मोहीम आहे. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांचे खंडपीठ वरिष्ठ वकील दर्जा मिळवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी CJI सूर्यकांत म्हणाले, “झुरळांसारखे असे तरुण आहेत, ज्यांना या व्यवसायात रोजगार मिळत नाहीये. यापैकी काही मीडिया, काही सोशल मीडिया आणि काही RTI व इतर प्रकारचे कार्यकर्ते बनत आहेत. हे प्रत्येकजणावर हल्ला करायला सुरुवात करतात.” त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही मोहीम सुरू झाली. नेमके काय म्हणाले अण्णा हजारे? लोकपाल आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी कॉक्रोच जनता पार्टीबाबत भाष्य करताना सरकारला मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “झुरळ हे नाव कदाचित योग्य वाटणार नाही, पण या पार्टीचा उद्देश समजून घेणे गरजेचे आहे. नाव काहीही असले तरी देशातील तरुण या पार्टीच्या पाठीशी उभा आहे. युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती असते. जेव्हा या दोन्ही शक्तींचा संगम होतो, तेव्हा सरकारने त्यांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” बंदीनंतर पुन्हा उभारी; इन्स्टाग्राम खाते परत मिळाले दरम्यान, गेल्या काही दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीचे ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’ अकाऊंट आणि त्यानंतर १० लाख नोंदणी झालेले अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले होते. यंत्रणांनी दिलेल्या या झटक्यानंतरही सीजेपीने हार मानलेली नाही. संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, त्यांनी त्यांचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा मिळवले असून पक्ष नव्या दमाने कामाला लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात दरम्यान, या आभासी पक्षामुळे चर्चेत आलेले अभिजीत दीपके यांना अज्ञात व्यक्तींकडून धमक्या आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, सिडको वाळूज महानगर-१ येथील त्यांच्या पालकांच्या घरासमोर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी दोन अधिकारी आणि २२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *