![]()
गोखलेनगर परिसरात हर्ष मच्छिंद्र जाधव (वय २३) या तरुणाच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून जवळच्या मित्रानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हर्षचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत नवी मुंबईतून अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना अटक केली आहे. मयत हर्ष जाधव आणि आरोपी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून ‘कॉमन गर्लफ्रेंड’वरून तीव्र वाद सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी हर्षने दारूच्या नशेत आरोपीच्या घरात घुसून गोंधळ घातला होता. त्याने आरोपीच्या कुटुंबीयांसमोरच त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या अपमान आणि धमकीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हर्षचा खून करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी पहाटे पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास हर्ष जाधव त्याच्या घराबाहेर एका रिक्षात बसला होता. तिथे पोहोचलेल्या आरोपींनी हर्षला जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढले. त्यांनी बेसबॉल स्टिकने त्याच्यावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान बेसबॉल स्टिकचा एक जोरदार वार हर्षच्या कानावर बसला, ज्यामुळे त्याचा कान फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी गोळा झाल्यावर आरोपी तिथून पळून गेले. जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसतानाही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. परिमंडळ ४ चे डीसीपी रजनीकांत चिलीमुला यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार ‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून आणि घरात घुसून दिलेल्या धमकीच्या रागातून घडला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Source link
'कॉमन गर्लफ्रेंड' वादातून मित्रानेच केला मित्राचा खून:पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा, तिन्ही आरोपींना अटक