![]()
नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ मध्ये ‘भारत 2035: एक आत्मनिर्भर राष्ट्र’ या संकल्पनेवर विचारमंथन करण्यात आले. वर्ष 2035 पर्यंत भारत हरित बांधिलकी आणि शाश्वत ऊर्जेच्या बळावर कसा आत्मनिर्भर बनू शकतो, यावर या परिषदेत विशेष चर्चा झाली. या प्रसंगी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची विशेष मुलाखतही घेण्यात आली. महाराष्ट्राचे हरित ऊर्जा परिवर्तनाकडे वेगाने पाऊल महाराष्ट्राला स्वच्छ व हरित ऊर्जेकडे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प राबवले जात आहेत. ऊर्जा परिवर्तनासाठी अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार केला असून, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली या आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख उद्दिष्टे आणि यश 2030 चे लक्ष्य: महाराष्ट्राच्या वीज नियोजनात 2030 पर्यंत तब्बल 45,000 MW अतिरिक्त वीज क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. नवीकरणीय ऊर्जेचा वाटा: वाढीव क्षमतेपैकी 38,000 MW वीज ही हरित स्रोतांकडून मिळवून एकूण ऊर्जेतील अपारंपरिक ऊर्जेचा वाटा 50% पेक्षा अधिक करण्याचे ध्येय आहे. दीर्घकालीन करार: महावितरणने केलेल्या एकूण वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल 65% वाटा हरित ऊर्जेचा आहे. सौर कृषी वाहिनी योजना 2.0: शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या उद्देशाने 16,000 MW क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यापैकी सध्या 5,500 MW पेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून, तब्बल 15 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप: या योजनेद्वारे 10 लाख पेक्षा अधिक ‘ऑफ-ग्रिड’ सौर कृषी पंप यशस्वीरीत्या कार्यान्वित करण्यात आले आहेत. रूफटॉप सोलर: छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे राज्यातील 9 लाख हून अधिक कुटुंबांचे वीजबिल शून्य किंवा नगण्य झाले आहे. महावितरणच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आणि शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील दूरदृष्टीमुळे लोकेश चंद्र यांचा या राष्ट्रीय व्यासपीठावर गौरव करण्यात आला.
Source link
कौतुकाची थाप:ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत गौरव