![]()
सोशल मीडिया, इंटरनेट आणि टीव्हीमुळे माणसाच्या मनोरंजनाच्या संकल्पना पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. या आधुनिकतेच्या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागातील जुन्या प्रथा आणि परंपरांना बसत असून, अनेक उत्सवांचे स्वरूपही बदलले आहे. सोंगांचे मुखवटे बनवणारी पिढी आणि हे कलाकार आता अखेरचा श्वास घेत आहेत. मात्र, हीच धोक्यात आलेली समृद्ध परंपरा टिकवून ठेवण्यासाठी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. खंडाळ्यातील धार्मिक उत्सवांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या पारंपरिक आखाडी (देवी) उत्सवाची शुक्रवारी उत्साहात सांगता झाली. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या सामाजिक परिस्थितीचा प्रभाव असतो आणि त्यानुसार त्याचे रूपांतर होत असते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अदृश्य मुखवटा असतो, जो स्वार्थ, व्यथा, वेदना आणि सुख इतरांपासून लपवून ठेवतो. यामुळेच चेहरा आणि मुखवटा हे समीकरण नेहमीच मानवी मनाला स्तिमित करत आले आहे. हे मुखवटे कधी, कसे आणि कोणी आणले? असे प्रश्न पडत असले, तरी प्रत्येक धर्मात आणि समाजात परंपरेच्या अर्थाने मुखवट्यांना एक वेगळे स्थान आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून खंडाळा येथे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या देवांचे मुखवटे परिधान करून आखाडी पंचमी साजरी केली जाते. यंदा २४ मे पासून या उत्सवाला सुरुवात झाली होती. पाच दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता २९ मे रोजी पहाटे भवानी मातेचे सोंग काढून झाली. भवानी मातेच्या सोंगाची गावातून भव्य मिरवणूक यंदा भवानी मातेचे सोंग घेण्याचे मानकरी अमोल गोरखनाथ बहाळस्कर होते. पहाटे भवानी मातेच्या सोंगाची संपूर्ण गावातून वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी दारोदारी भवानी मातेच्या स्वरूपातील या सोंगाची मनोभावे पूजा केली. आधुनिकतेच्या काळातही खंडाळावासीयांनी जपलेली ही मुखवट्यांची परंपरा आणि संस्कृती पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.
Source link
खंडाळा येथे पारंपरिक आखाडी पंचमी उत्सवाची उत्साहात सांगता:पारंपरिक मुखवट्यांची संस्कृती जपण्यासाठी नागरिकांचा पुढाकार