![]()
तालुक्यातील खवणी येथे श्री बिरोबा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, धुळदेव ओवीकार मंडळ (नजीकपिंपरी) यांनी धनगरी ओव्यांच्या माध्यमातून उपस्थित तरुणाईला समाजप्रबोधनाचा मौलिक संदेश दिला
.
ओवी जागरणातून प्रबोधन करताना ओवीकार मंडळाने सांगितले की, आमच्या पूर्वजांमध्ये विचारांची भिन्नता असली तरी त्यांच्या मनामध्ये आपुलकीचा झरा वाहत होता. मात्र, आजच्या युगातील बहुतांश युवक पिढीमध्ये ही आपुलकी संपुष्टात येत असल्याचे दिसते. अनेक हृदयद्रावक घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी युवकांनी पूर्वजांनी दिलेल्या विचारांचा वारसा जोपासणे काळाची गरज आहे.
सोमवार, दि. ४ मे रोजी सायंकाळी धनगरी ओव्यांचा कार्यक्रम आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. मंगळवारी सकाळी ६ वाजता गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरतीचे ताट, सुकवडा, फुलमाळा आणि घुगऱ्या घेऊन मिरवणुकीने मंदिरात हजेरी लावली. पाळणा गायनासह विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी १२ वाजता पट्टणकोडोलीचे मानकरी परमपूज्य फरांडे महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती झाली.
दिमाखदार स्वागत आणि महाप्रसाद फरांडे महाराज यांच्या स्वागतासाठी गावात सडा-रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे दिमाखात स्वागत झाले. भाविकांनी महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री १० वाजता फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खवणी ग्रामस्थांनी आणि अबालवृद्धांनी मोठे परिश्रम घेतले.