.

वैशाख वणव्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाची दाहकता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. दैनंदिन तापमानाचा पारा सरासरी ४० अंशांच्या पुढे गेल्याने मानवासोबतच आता भटक्या प्राण्यांसह पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक संस्था, संघटना आणि पक्षीप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरी भागात प्रामुख्याने पारवे, मैना, पोपट, भारव्दाज, चिमण्या, कावळे, घारी, बुलबुल यांसारखे पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. मात्र, वाढत्या उन्हामुळे विहिरी, सार्वजनिक पाणवठे आणि तलावांतील पाणी पातळी खालावल्याने या पक्ष्यांना थेंबभर पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. राखीव वनक्षेत्रात वन्यजीवांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करून कृत्रिम पाणवठे भरले जातात, मात्र शहरी भागातील पक्षी व भटक्या प्राण्यांचे हाल होत आहेत. पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत मातीची उथळ भांडी ठेवावीत. ही भांडी उंच छताला किंवा भिंतीला टांगून पक्ष्यांच्या पाण्याची सोय कमी खर्चात करता येते. घराच्या परिसरातील बागेत किंवा झाडांना ही उथळ भांडी पिण्याच्या पाण्याने भरून टांगल्यास पाण्याच्या शोधार्थ भटकणाऱ्या पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघात होऊन पाण्याअभावी पक्षी व वन्यजीव मरण्याची भीती असते. नेचर कॉन्झरव्हेशन सर्कलच्या वतीने घरगुती पद्धतीने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे घराघरात पक्ष्यांना खाद्य व पिण्याचे पाणी पुरवता येऊ शकते. – प्रतीक तलावाड, प्राणिमित्र, बार्शी
अशी करता येईल पाण्याची सोय
पिण्यासाठी पुरवता येऊ शकते