Headlines

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आदित्य सोळंके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. घाटीच्या रक्तपेढीने मूल्यांकन कालावधीत १५,०३२ रक्तपिशव्यांचे संकलन केले. तसेच, गरजू रुग्णांना २३,४४७ रक्त व रक्तघटकांचे सुरक्षित वितरण केले. रक्तपेढीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने २२४ स्वेच्छा रक्तदान शिबिरे यशस्वीपणे आयोजित करून जनजागृती केली. विशेषतः, अत्यंत दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या तीन रुग्णांना आणि अनेक ‘आरएच निगेटिव्ह’ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यात आले. ऑटोइम्यून हिमोलिटिक ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या तीन थॅलेसेमिया रुग्णांना ‘सबग्रुप मॅच’ केलेले विशेष रक्त पुरवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यापूर्वीही रक्तपेढीला स्थानिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते रक्तपेढीला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले होते. २६ जानेवारी २०२६ रोजी जीएमसीएच प्रशासनानेही या टीमचा सत्कार केला होता, तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने (MSACS) देखील या रक्तपेढीचा गौरव केला आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे आणि पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भरत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रक्तसंक्रमण अधिक अचूक करणारी जेल कार्ड प्रणाली, थॅलेसेमिया बालकांसाठी स्टेराइल कनेक्टिंग डिव्हाइस आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी एनएएटी (NAAT) तपासणीची पूर्वतयारी समाविष्ट आहे. डॉ. वैशाली नागोसे (प्रभारी, २०२४-२५) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विनी तांगडे, डॉ. विजया वाणे, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. प्रमोद सरवडे, प्रयोगशाळा कर्मचारी, परिचारिका आणि समुपदेशक यांनी या यशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *