Headlines

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात:वाकड येथील काँग्रेसच्या युवा नेत्याचा जागीच मृत्यू, कोण होते तुषार भूमकर?




मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्यात शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात पुण्यातील वाकड येथील काँग्रेसचे युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या त्यांच्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या एका भाजीपाल्याच्या मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अनर्थ ओढवला. ही धडक इतकी भयंकर होती की यात फॉर्च्युनर आणि टेम्पो या दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे, तर सुदैवाने अन्य तिघे सुखरूप बचावले आहेत. तुषार भूमकर हे पुण्यातील वाकड परिसरातील रहिवासी असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाचे एक अभ्यासू व अत्यंत सक्रिय युवा नेते म्हणून त्यांची ख्याती होती. सामाजिक उपक्रमांमधील सहभाग, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत ते नेहमीच आघाडीवर असत. तरुणांमधील दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण पुढाकार यामुळे त्यांनी स्थानिक राजकारणात आपली एक स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली होती. तुषार भूमकर यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच मित्रपरिवार, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. तुषार यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण वाकड परिसरासह काँग्रेस पक्षाच्या स्थानिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून, एका उमद्या युवा नेतृत्वाचा करुण अंत झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबीचे (IRB) ‘देवदूत’ पथक आणि स्थानिक मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना शर्थीचे प्रयत्न करून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि पुढील वैद्यकीय उपचारांसाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुंबईकडे जाणारा मार्ग 2 तास ठप्प या दुर्दैवी घटनेमुळे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी तातडीने पावले उचलत सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवली. काही वेळानंतर क्रेनच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आल्यावर एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली असून, महामार्ग पोलीस आता या संपूर्ण अपघाताचा अधिक तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *