Headlines

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई:पाच जणांवर गुन्हा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त




हिंगोली शहरात तसेच लगतच्या नवीन वसाहतीमध्ये अवैधरित्या फटाके साठवून ठेवलेल्या पाच गोदामांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर तर एका जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कपडागल्ली भागात अवैधरित्या फटाके साठवलेल्या गोदामाला आग लागून तिघांचा बळी गेला तर 10 जण गंभीर जखमी आहेत. या शिवाय दोन घरे, तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांनी तातडीने शहरात तपासणी करून अवैधरित्या फटाके साठवून ठेवलेल्या ठिकाणावर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हिंगोली शहरात उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, पालिका मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, मंडळ अधिकारी प्रदीप इंगोले, पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, आकाश देशमुख, आकाश तांडेल यांच्या पथकाने छापासत्र सुरु केले. यामध्ये चार ठिकाणी छापे टाकून फटाक्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मंडळ अधिकारी इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी शामसुंदर अग्रवाल, जतीन साहु, सुनील फटाले, नवनीत फटाले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार बी. व्ही. चिंतारे, अशोक धामणे पुढील तपास करीत आहेत. याशिवाय हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक गफार शेख, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार बाळासाहेब खोडवे यांच्या पथकाने शहरालगत कारवाडी भागात छापा टाकला. यामध्ये एका गोदामातून फटाक्यांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक वग्गे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी विजय बासटवार याच्या विरुध्द गुरुवारी ता. ८ गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक वग्गे पुढील तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *