![]()
“देशातील जनतेने निवडून दिलेले पावणेतीनशे खासदार एकत्र येऊन संविधानाचा हक्क मागण्यासाठी मोर्चा काढतात, तेव्हा त्यांना भेटायला निवडणूक आयोगाचा साधा एक प्रतिनिधीही बाहेर येत नाही. देशाच्या इतिहासात अशी परिस्थिती कधीही पाहायला मिळाली नव्हती. जनतेचे प्रश्न, संशय आणि विरोधकांचे आरोप यांना समोर जाऊन ‘फेस’ (Face) करण्याची कोणतीही व्यवस्था या सरकारमध्ये उरलेली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे उत्तरेच शिल्लक नसल्यामुळे ते पळ काढत आहेत,” असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरात आयोजित किसान सभेच्या अधिवेशनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, मतदार यादीतील ‘एसआयआर’ मोहीम, पुण्यातील एमपीएससी आंदोलन, शक्तिपीठ महामार्गाची जबरदस्तीने होणारी मोजणी आणि शरद लाड यांच्या भाजप प्रवेशावर अत्यंत टोकदार शब्दांत भाष्य केले. ज्ञानेश कुमारांनी खुलासा करावा; SIR मताधिकारासाठी की मतदारांना वगळण्यासाठी? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट मागितल्यानंतर ‘असे कधी होत नाही’ असे सांगून भेट नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात फॉर्म-6 संदर्भात जे मुद्दे समोर आले आहेत, ते अतिशय गंभीर आहेत. तीनपैकी दोन निवडणूक आयुक्तांचा अंतर्गत पत्रव्यवहार उघड झाल्याने यंत्रणेत केवळ एकाच व्यक्तीची मनमानी सुरू असल्याची खात्री देशाला झाली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी जनतेसमोर येऊन खुलासा केला पाहिजे.” मतदार वगळण्याचा संशयास्पद प्रकार “पूर्वी काँग्रेसच्या काळात ‘एसआयआर’ (SIR) मोहीम राबवली जायची, ती जास्तीत जास्त नागरिकांना मतदार यादीत समाविष्ट करून मताधिकार देण्यासाठी असायची; कोणालाही वंचित ठेवण्यासाठी नाही. मात्र, सध्या कमीत कमी मतदार यादीत कसे राहतील, असा उलटा कारभार सुरू असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.” मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांचा तत्काळ राजीनामा घ्यावा पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “सामान्य कुटुंबातील मुले मोठ्या जिद्दीने अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. परंतु परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरकारभारामुळे या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. हा केवळ पुण्यात बसलेल्या मुलांचा विषय नसून महाराष्ट्रातील लाखो पालकांच्या मनातील संताप आहे.” जबाबदारी निश्चित करा “आम्ही काही सरकार पाडण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत नाही आहोत. मात्र, ज्यांच्या कार्यकाळात पेपरफुटी झाली त्या एमपीएससीच्या अध्यक्षांची जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा सरकारने तातडीने घेतला पाहिजे. सरकारने थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून हा तिढा सामोपचाराने सोडवला पाहिजे.” आंदोलन बदनाम करण्याचे सत्ताधाऱ्यांचे डावपेच रात्रीच्या कथित राड्याच्या आरोपांवर बोलताना पाटील म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडणे आणि आंदोलनाला बदनाम करणे हे सत्ताधाऱ्यांचे जुने तंत्र आहे. सरकारने पालकाची भूमिका घेऊन सर्व आंदोलक घटकांना एकत्र बसवून न्याय दिला पाहिजे.” तिजोरीत खडखडाट, मग शक्तिपीठ रस्ता कोणासाठी? शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या विरोधावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. “पंढरपुरात 500 पोलिसांचा बंदोबस्त लावून, गावांची नाकेबंदी करून शेतकऱ्यांना घरात डांबून जमिनींची मोजणी केली जात आहे. पोलीस हातात आहेत म्हणून लोकांवर अशी दहशत माजवणे लोकशाहीला शोभत नाही. यामुळे सरकारची प्रतिमा अत्यंत डागाळत असून याचे गंभीर राजकीय परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील.” लाखो कोटींचा विरोधाभास “राज्यात भीषण दुष्काळ आहे, शेतकऱ्यांना द्यायला निधी नाही, कंत्राटदारांची लाखो कोटींची बिले वर्ष-दोन वर्षे थकलेली आहेत आणि ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे देताना सरकारी तिजोरीची त्रेधातिरपीट उडत आहे. अशा बिकट आर्थिक संकटात 1 लाख कोटी रुपयांचा महामार्ग लादण्याचा अट्टाहास कशासाठी? आधीच रस्ते आणि दळणवळणाची साधने अस्तित्वात असताना या पांढऱ्या हत्तीचा भार जनतेवर कशासाठी टाकला जात आहे?” दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचा विजय निश्चित पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीबाबत बोलताना त्यांनी आघाडीच्या विजयाचा दावा केला. “काँग्रेसचे जयंत तासगावकर हे शिक्षक मतदारसंघात तर आमच्या हर्षदा देशमुख-जाधव या युवा चेहरा म्हणून पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.” शरद लाड यांच्या भाजप प्रवेशावर म्हणाले- मी आधीच सावध केले होते! अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही त्यांना उमेदवारी न मिळाल्याच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांनी सत्य उघड केले. “शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करत असताना मी स्वतः त्यांना समजावून सांगितले होते की, ‘जाऊ नका, शेवटच्या दोन दिवसांत भाजप तुम्हाला तिकीट देणार नाही आणि त्यावेळी तुम्ही काय करणार?’ दुर्दैवाने माझे बोलणे तंतोतंत खरे ठरले.” “वडिलांची आमदारकी आपल्याला मिळेल या आशेने ते भाजपमध्ये गेले, मात्र त्यांना उमेदवारी डावलण्यात आली. भाजपने स्वतःच्या एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तरी पक्षात स्वागत झाले असते; परंतु आयारामांना केवळ आमिषे दाखवून नंतर वाऱ्यावर सोडणे, हा भाजपचा नेहमीचाच अनुभव राहिला आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. ———————————————————– हेही वाचा… ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा खटला चालवून जेलमध्ये डांबा: पायाखालची वाळू सरकल्यानेच राहुल गांधींना रोज अटक; हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रावर टीका “देशातील कोट्यवधी वैध मतदारांची नावे संशयास्पदरीत्या वगळून नागरिकांना त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे हा थेट राष्ट्रविघातक गुन्हा आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले पाहिजे. ‘रंगा आणि बिल्ला’ म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते इतके घाबरले आहेत की देशाच्या विरोधी पक्षनेत्याला रोज रस्त्यावरून उचलून अटक केली जात आहे. मात्र, हा लढा आता केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून गल्लीबोळांपर्यंत पेटवला जाईल आणि भाजप नेत्यांना महाराष्ट्रात पळता भुई थोडी करू,” असा प्रखर आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
500 पोलिसांचा बंदोबस्त लावून, शेतकऱ्यांना घरात डांबून जमिनीची मोजणी!:दुष्काळाला पैसे नसताना 1 लाख कोटींचा शक्तिपीठ कशासाठी?, जयंत पाटलांचा सरकारला इशारा