![]()
आपल्या दमदार अभिनयाने आणि परखड विचारांनी अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. केवळ कलाक्षेत्रच नव्हे, तर प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडूनही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त, वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या या ‘जिवलग मित्रा’ला हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहिली आहे. “ती आमची शेवटची चर्चा ठरेल, याचा विचारही केला नव्हता…” तुकाराम मुंढे आणि नाना पाटेकर यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. नानांच्या निधनानंतर मुंढे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणी जागवल्या आहेत. ते म्हणाले, “नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. मी आज केवळ एका महान कलाकाराला मुकलो नाही, तर एका विलक्षण माणसाला आणि माझ्या एका जिवलग मित्राला गमावले आहे. ते असे व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्या आपुलकीचा आणि स्नेहाचा स्पर्श त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला जाणवला.” या पोस्टमध्ये पुढे एका अत्यंत भावूक क्षणाचा उल्लेख करत मुंढे यांनी लिहिले आहे, “आमचे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच बोलणे झाले होते. ती चर्चा आमची शेवटची ठरेल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.” ‘लव्ह यू बाळा’ – ते शेवटचे शब्द! नाना पाटेकरांसोबतच्या त्या शेवटच्या फोन कॉलबद्दल बोलताना तुकाराम मुंढे गहिवरले. त्यांनी सांगितले की, संभाषणाच्या शेवटी नाना मला म्हणाले होते- लव्ह यू बाळा. त्यांचे हे शेवटचे शब्द माझ्या कायम स्मरणात राहतील, असे मुंढे यांनी अत्यंत भावूकपणे नमूद केले आहे. ‘काही माणसं स्वतःचा अंश मागे सोडून जातात’ नाना पाटेकरांच्या व्यक्तिमत्त्वाला सलाम करताना मुंढे शेवटी लिहितात, “काही माणसे आपल्या जाण्यानंतर फक्त आठवणी मागे ठेवून जातात. पण काही मोजकी माणसे अशी असतात, जी जाताना आपलाच एक अंश आपल्या आयुष्यात मागे ठेवून जातात. नाना हे अशाच व्यक्तींपैकी एक होते. अलविदा माझ्या मित्रा! तुझी खूप आठवण येईल आणि तू कायम स्मरणात राहशील.” ———– संबंधित बातम्या वाचा.. नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन:100 हून अधिक चित्रपट, 3 राष्ट्रीय, 4 फिल्मफेअर पुरस्कार; कारगिल युद्धादरम्यान सैन्यासोबत होते ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:संवेदनशील, अष्टपैलू अन् करारी अभिनेता गमावला; नानांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा
Source link