Headlines

ज्ञानेश कुमारांवर देशद्रोहाचा खटला चालवून जेलमध्ये डांबा:पायाखालची वाळू सरकल्यानेच राहुल गांधींना रोज अटक; हर्षवर्धन सपकाळ यांची केंद्रावर टीका




“देशातील कोट्यवधी वैध मतदारांची नावे संशयास्पदरीत्या वगळून नागरिकांना त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे हा थेट राष्ट्रविघातक गुन्हा आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड केले पाहिजे. ‘रंगा आणि बिल्ला’ म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते इतके घाबरले आहेत की देशाच्या विरोधी पक्षनेत्याला रोज रस्त्यावरून उचलून अटक केली जात आहे. मात्र, हा लढा आता केवळ दिल्लीपुरता मर्यादित नसून गल्लीबोळांपर्यंत पेटवला जाईल आणि भाजप नेत्यांना महाराष्ट्रात पळता भुई थोडी करू,” असा प्रखर आणि आक्रमक इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींवर झालेली पोलीस कारवाई, केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार, पुण्यातील एमपीएससीचा लढा आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या ‘दिल्लीवाऱ्यां’वर अत्यंत तिखट शब्दांत भाष्य केले. मतदारांचा हक्क हिरावणे हा देशद्रोह; ‘रंगा-बिल्ला’ ज्ञानेश कुमारांना का पाठीशी घालत आहेत? केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेवर आणि दिल्लीतील घडामोडींवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “काँग्रेस, ‘इंडिया’ आघाडी आणि राहुल गांधी यांची अत्यंत साधी व घटनात्मक मागणी आहे. मतदार यादीतील फॉर्म-६ मधील नियमबाह्य बदल आणि एसआयआरच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारांबाबत निवडणूक आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून जाब विचारणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. राहुल गांधी हे देशाचे सजग नागरिक आणि विरोधी पक्षनेते म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना दिल्ली पोलीस त्यांच्या मार्गात अडथळे आणत आहेत.” देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा “ज्ञानेश कुमार हे भाजपच्या इशाऱ्यावर स्वतंत्र यंत्रणांचा गैरवापर करून देशाची लोकशाही संपवण्याचे काम करत आहेत. वैध मतदारांची नावे कापून मतचोरी करणे हा अक्षम्य देशद्रोह आहे. संविधानाचा गळा घोटणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर तात्काळ देशद्रोहाचा खटला दाखल व्हायला हवा. पण ‘रंगा आणि बिल्ला’ त्यांचा बचाव का करत आहेत, याचे उत्तर जनतेला हवे आहे.” गावागावांत आंदोलनाची ठिणगी “दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढणाऱ्या राहुल गांधींना कालही उचलले आणि आजही अटक केली. देशात उघडपणे हुकूमशाहीचा नंगानाच सुरू असून देशाला अराजकतेच्या खाईत लोटले जात आहे. दिल्लीत पेटलेला हा असंतोष आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावागावांत काँग्रेस पोहोचवेल. भाजप नेत्यांना रस्त्यावर फिरताना जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” एमपीएससीचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचे मित्र; भ्रष्टाचार सुरू ठेवण्याचे ‘मॅन्डेट’ देऊनच नियुक्ती! पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनावर बोलताना सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला, “एमपीएससीच्या विविध परीक्षांमधील गोंधळ, औषध निरीक्षक पेपरफुटी आणि ढिसाळ कारभारामुळे आज हजारो विद्यार्थी पुण्याच्या रस्त्यावर बसले आहेत. आयोगाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र असल्यानेच त्यांना वाचवले जात आहे. मागच्या काळात झालेल्या घोटाळ्यांवर पडदा टाका आणि भ्रष्टाचाराचा कारभार अविरत सुरू ठेवा, हे ‘मॅन्डेट’ आणि ‘मिशन’ देऊनच त्यांची तिथे नियुक्ती करण्यात आली होती.” शासनाचा दुटप्पी कारभार “एकीकडे गैरप्रकार कबूल करून सचिवांची बदली केली जाते, तर दुसरीकडे मुख्य सूत्रधार असलेल्या अध्यक्षांची पाठराखण केली जाते. हा फडणवीस सरकारचा उघड दुटप्पीपणा आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत न पाहता वादग्रस्त अध्यक्षांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, 70 हजार पदांची रखडलेली मेगाभरती पारदर्शक पद्धतीने राबवावी आणि परीक्षांमधील घोळ कायमचा संपवावा.” महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यांवर त्यांनी बोचरी टीका केली. “महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसत नसून ते दिल्लीत अमित शाह यांच्या रूपाने बसलेले आहेत. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला कोणते खाते द्यायचे, कोणता पक्ष फोडायचा आणि कोणाला किती मंत्रिपदे द्यायची, हे सगळे निर्णय अमित शाह यांच्या दरबारात होतात.” भ्रष्टाचाराचा हिशोब द्यायला वाऱ्या “महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना, शेतकरी हवालदिल झालेला असताना हे नेते जनतेसाठी किंवा राज्याच्या भल्यासाठी दिल्लीला जात नाहीत. हे नेते मोठ्या तावातावाने दिल्ली दरबारी जातात, महाराष्ट्रात गोळा केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब शहा यांना सादर करतात आणि शेवटी हात हलवत परत येतात,” असा घणाघाती आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ——————————————– हेही वाचा… तीन-चार दिवसांत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला येणार होते: नाना पाटेकरांच्या निधनाने रोहित पवार भावुक, म्हणाले- ही भेट आता कधीच होणार नाही ज्येष्ठ अभिनेते आणि समाजातील प्रश्नांवर कायम परखडपणे मत मांडणारे नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पुण्यात विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. नानांना श्रद्धांजली वाहताना रोहित पवारांनी एक अत्यंत भावुक आणि खासगी आठवण शेअर केली आहे. अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वीच नानांनी या विद्यार्थी आंदोलनाला भेट देण्याचा शब्द दिला होता, मात्र ही भेट आता कायमची अपूर्णच राहिल्याची खंत त्यांनी भरल्या अंतःकरणाने व्यक्त केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *