![]()
“अरे वरूणराजा, कसा कोपला रे तू मनावर… वाळी गया शेत-शिवार, पाणी दे रे माय-बापा!’
.
या अहिराणी लोकगीताचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो फोडत बागलाण तालुक्यातील भवाडे पाड्यावर आदिवासी महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन निसर्गदेवतेला आर्त साकडे घातले. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने शिवारेच्या शिवारे जळून खाक झाली असून, तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग या खरीप पिकांसह नगदी डाळिंबबागा व वेलवर्गीय पिकांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसल्या आहेत. एकरी १५ ते २५ हजार रुपयांचा केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्याने पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बँक व सावकारांचे उंबरठे झिजवून उभारलेले भांडवल मातीमोल झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
पाणीसाठे कोरडेठाक पडल्याने भवाडेत महिलांनी रिकामे हंडे घेत अहिराणी लोकसंस्कृतीच्या माध्यमातून व्यथा मांडली. “निसर्गाने हात वर केले अन् पिके जळून खाक झाली, तर आम्ही जगायचे कोणाच्या आधारावर’ असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.