![]()
काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधताना गावागावात अनेक पायाभूत सुविधा पोहोचवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.
.
मुंबईत आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरा, लोककला, हस्तकला, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीचा नव्याने परिचय करून देणाऱ्या ‘आदिवासी संस्कृती उत्सव – वनरंग 2026’ या महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन झाले असून, या विशेष कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावून उपस्थित आदिवासी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला.
काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, आदिवासी संस्कृती ही केवळ परंपरा नाही, तर निसर्गाशी सुसंवाद साधणारी, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आणि शाश्वत विकासाचा मार्ग दाखवणारी जीवनपद्धती आहे. त्याचबरोबर समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि व्यापक संवर्धन ही काळाची गरज आहे. राज्य शासन शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण तसेच रस्ता, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे.
पुढे बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, डिजिटल युगातही बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत, हस्तकलेचा वारसा जिवंत ठेवायला पाहिजे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, क्रांतीवीर रोघाजी भांगरे यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे.
सुवर्णपदक विजेता दिलीप गावितचे केले कौतुक
महायुती सरकारने आदिवासी विकास आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिलेय. अजित पवारांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केले. आदिवासी समाजाला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिलाय. सरकार आणि पक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आक्षमशांचे आधुनिकीकरण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबवले जाताहेत. त्यानंतर नाशिकच्या दिलीप गावित याने ग्लास्को येथील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, असे म्हणत त्यांनी त्याचे कौतुक देखील केले.
आदिवासी जीवनशैली आणि हस्तकलेचे भव्य प्रदर्शन
7 ते 9 ऑगस्ट दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या त्रिदिवसीय महोत्सवात भेट देणाऱ्यांसाठी अनेक विविध आकर्षणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या कार्यक्रमस्थळी विशेषत्वाने महाराष्ट्रातील भिल्ल, कोकणा, ठाकर आणि गोंड या चार प्रमुख आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचा आणि त्यांच्या समृद्ध इतिहासाचा पट मांडणारी भव्य प्रदर्शने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यासोबतच, केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातील इतर 12 राज्यांमधून आलेल्या आदिवासी हस्तकलेचे प्रीमियम स्टॉल्सही येथे उभारण्यात आले असून, ते महोत्सवाचे एक मुख्य आकर्षण ठरत आहेत.
मास्टरक्लास, कार्यशाळा आणि ‘ट्रायबल लंच’ची मेजवानी
या महोत्सवादरम्यान विविध महत्त्वाचे मास्टरक्लास आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून, यात पद्मश्री राहीबाई पोपेरे, पद्मश्री भिकल्या लाड्या धिंडा तसेच मे 2026 मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी गिर्यारोहक अनिल वसावे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. या व्यतिरिक्त, अर्जुन पुरस्कार विजेत्या ॲथलीट कविता राऊत यांच्यासह इतर दिग्गज मंडळी आदिवासी खेळाडूंना भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करणार आहेत. सोबतच वारली आणि गोंड पेंटिंगच्या थेट कार्यशाळाही आयोजित केल्या जातील. विशेष म्हणजे, महोत्सवाच्या सांगतादिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी ताजचे प्रसिद्ध शेफ रघु देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा ‘ट्राइबल लंच’ही सादर केला जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.