![]()
हिंगोली शहरातून बेपत्ता झालेल्या 23 वर्षीय तरुणाचा विदर्भातील खंडाळा पोलिस ठाण्यांतर्गत सत्तमाळ जंगलात खून झाल्याचे उघड झाले असून 6 लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील सिध्दार्थनगर भागातील मंगेश उर्फ काल्या मनवर (23) हा ता. 2 ऑगस्ट सकाळी नेहमी प्रमाणे कामावर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो परत आला नसल्याने त्यांच्या कुटुबियांनी त्यांचा शोध सुरु केला होता. त्यानंतर ता. 4 ऑगस्ट रोजी त्याच्या कुटुंबियांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याचा अर्ज दिला होता. त्यावरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, जमादार अशोक धामणे यांच्या पथकाने अधिक माहिती घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, यवतमाळ जिल्हयातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सत्तरमाळ जंगलात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळ्यावर, पाठीवर वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. अधिक माहिती नंतर सदर मृतदेह हिंगोलीतील बेपत्ता तरुण मंगेश मनवर याचा असल्याचे स्पष्ट झाले. यावरून खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यवतमाळचे पोलिस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक थोरात, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांनी पथके स्थापन करून माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांचे पथक हिंगोलीत आले होते. जमादार धामणे यांच्या मदतीने त्यांनी आवश्यक माहिती गोळा केल्यानंतर आरोपींची नावे निष्पन्न झाली. यामध्ये पोलिसांनी ज्ञानेश्वर राठोड, राहुल लोखंडे, श्रावण भवाळ, सोमनाथ हजारे, विशाल राठोड, अर्जुन शेळके, दीपक जाधव, सिध्दार्थ जाधव (सर्व रा. वाशीम जिल्हा) यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी सहा लाख रुपयांमध्ये सुपारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडाळा पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे.
Source link
हिंगोलीतील बेपत्ता तरुणाचा विदर्भातील सत्तरमाळ जंगलात खून:आठ जणांना अटक, यवतमाळ गुन्हे शाखेची कामगिरी