![]()
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सीएनजीचा पुरवठा विस्कळित झाल्याने रिक्षाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पंपांवर कमी दाबाने गॅस मिळत असल्याने चालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून दैनंदिन उत्पन्नावरही परिणाम होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी लवकरच गॅस पुरवठादार कंपन्या, पंपचालक आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले. रिक्षा पंचायतीने प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००९ पासून शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी सीएनजीची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, सुमारे १७ वर्षांनंतरही नियमित आणि पुरेशा दाबाने गॅस उपलब्ध होत नाहीये. सध्या सीएनजीचे दर प्रतिकिलो ९५.७५ रुपयांवर पोहोचले असून, वाढता इंधनखर्च आणि अपुरा पुरवठा यामुळे रिक्षा व्यवसायाचे अर्थकारण कोलमडले आहे. कमी दाबामुळे अनेक पंपांवर रिक्षांमध्ये पूर्ण क्षमतेने गॅस भरला जात नाही, परिणामी चालकांच्या फेऱ्या कमी होत आहेत. याचा फटका प्रवाशांनाही बसत असून, रिक्षा मिळण्यास विलंब होत आहे. पुरवठा व्यवस्थेतील तांत्रिक अडचणींचा तातडीने आढावा घेऊन उपाययोजना करण्याची मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे. दरम्यान, नवीन रिक्षा भाडेदर लागू झाल्यानंतर सर्व रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण पूर्ण होईपर्यंत अधिकृत भाडेदर पत्रक वापरण्यास प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTA) मान्यता दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी ही माहिती शिष्टमंडळाला दिली. यामुळे मीटरमध्ये नवीन दरांचे प्रोग्रॅमिंग होईपर्यंत चालक आणि प्रवाशांमधील भाडेवाद टाळण्यास मदत होईल. रिक्षा पंचायतीने मीटर प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जीपीएस आणि मोबाइल मीटर ॲपचा पर्याय स्वीकारण्याची मागणी केली आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये नवीन दर प्रोग्रॅम करण्यासाठी कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मोहन चिंचकर, बाळासाहेब पोकळे, सोपान घोगरे, समीर शेख, मन्सूर शेख आणि विजय जगताप यांचा समावेश होता. नितीन पवार म्हणाले, “प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजीची सक्ती करण्यात आली, मात्र आजही चालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पुरेशा दाबाने आणि नियमित इंधनपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात.”
Source link
पुणे-पिंपरीमध्ये सीएनजी पुरवठा विस्कळित:रिक्षाचालकांवर तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ