![]()
ओडिशातून पुण्यात विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल १५२ किलो ६१० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि संगमनेर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे केलेल्या या कारवाईत गांजासह टाटा नेक्सॉन कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ८८ लाख ७७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत ७६ लाख ३० हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी पोलीसांनी दत्तात्रय नानाभाऊ इचके (३३) आणि श्रीहरी बाळू मिडगुले (३५, दोघे रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत हा गांजा ओडिशातील कुंफू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. हा माल साहेबराव ऊर्फ भाऊसाहेब बाबू मिडगुले (रा. कान्हूर मसाई, ता. शिरूर) आणि विशाल ऊर्फ दादया (रा. पुणे) यांना देण्यात येणार असल्याचे तपासात समोर आले. या दोघांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, संगमनेर शहरचे निरीक्षक संदीप वऱ्हाडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात प्रामुख्याने ओरिसा आणि आंध्र प्रदेशातून गांजाचा मोठा पुरवठा होत असल्याचे समोर येत असले तरी जिल्ह्यातील नेवासा, पाथर्डी व श्रीगोंदा या व इतर तालुक्यांमध्येही अशा छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जात आहे. नुकताच अहिल्यानगर शहरात घराच्या अंगणातच गांजाची शेती करून त्याची विक्री करण्याचा प्रकारही कारवाईतून उघडकीस आला आहे. मेफेड्रॉन प्रकरणातील २१ आरोपी गजाआड ^ जुलै महिन्यात तोफखाना पोलीस स्टेशनने एमडी ड्रग्स पकडले होते. या प्रकरणाचा तपास एलसीबीकडून सुरू असून, आतापर्यंत ५८ आरोपी निष्पन्न झाले . त्यापैकी २१ जणांना अटक केली. ड्रग्स विकणारेच नव्हे, तर पुरवठा साखळीतील सर्व आणि थोडे जरी ड्रग्स सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करू. “ड्रग-फ्री’ अहिल्यानगरसाठी नागरिकांना सहकार्य करावे. – मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक
Source link
खाकी:ओडिशातून पुण्याकडे जाणारा 152 किलो गांजा सायखिंडीमध्ये पकडला