![]()
काही झाडे सावली देतात, काही आठवणी देतात… पण काही झाडे माणसांना जगण्याचा अर्थ शिकवतात! पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात पुनरोपित करण्यात आलेल्या ‘सिद्धार्थ’ वडाचा पहिला वाढदिवस असाच भावुक वातावरणात साजरा झाला. केक कापून व झाडाला मिठी मारून त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पर्यावरणप्रेमींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. गेल्या वर्षी जूनमध्ये पाथर्डी पंचायत समितीच्या आवारातील शेकडो वर्षे जुना विशाल वटवृक्ष वादळी वाऱ्यात कोसळला. तब्बल तीन महिने तो तसाच पडून होता. मात्र, पर्यावरणप्रेमी शिक्षकांनी हार मानली नाही. ‘वृक्ष पडला म्हणजे संपला नाही… त्याला पुन्हा उभे करता येईल,’ या विचारातून पुनरोपणाची संकल्पना पुढे आली. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी वडाच्या फांद्यांचेही पुनरोपण करता येऊ शकते, अशी कल्पना मांडली. त्यानंतर वडाच्या ७५ फांद्यांचे पुनरोपण करण्यात आले. वटवृक्षाच्या या नव्या प्रवासाला ‘सिद्धार्थ’ हे नाव देण्यात आले. आज त्यातील तब्बल ६८ फांद्यांना पालवी फुटली आहे. आनंदवन परिसर पुन्हा हिरवाईने बहरला आहे. सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाचे सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी केक कापून आणि वडाला आलिंगन देत हा अनोखा वाढदिवस साजरा केला. यावेळी पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वडाच्या पुनरोपणासाठी गिरिकर्णिका संस्था, बालानंद परिवार, ग्रीन क्लब, तिलोकचंद जैन विद्यालय, आनंद महाविद्यालय आणि शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांनी वडाला मिठी मारुन झाडाचा वाढदिवस साजरा केला. माणसांचे प्रेम नाही मिळाले, पण निसर्गाने भरभरून दिले आयुष्यात माणसांकडून म्हणावे तसे प्रेम कधीच मिळाले नाही, उलट अनेकदा दु:खाचेच अश्रू वाट्याला आले. परंतु, जेव्हा गावापासून दूर डोंगरात राहणाऱ्या आमच्या कुटुंबाला वन्यजीव आणि निसर्गाची सोबत लाभली, तेव्हा तोच खरा जिव्हाळा ठरला. बालानंद ग्रुप आणि आनंदवनाशी जुळलेल्या या प्रवासात मिळालेल्या जीवाभावाच्या मित्रांच्या सहवासात आल्यावर लक्षात आले की, माणसांतही अजूनही माणुसकी जिवंत आहे, असे सिद्धार्थ सोनवणे यावेळी म्हणाले.
Source link
पर्यावरण संवर्धन:वादळ हरले, वड जिंकला; ‘सिद्धार्थ’च्या ६८ फांद्यांना पालवी