![]()
सोशल मीडियावर ताहाराबाद व मुल्हेर परिसरात वाहनचालकांना अडवून पैसे मागितले जात असल्याचा संदेश प्रसारित झाल्यानंतर तृतीयपंथीय समाज आक्रमक झाला. समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप करत तृतीयपंथीयांनी सोमवारी (दि. ५) ताहाराबाद येथील गजानन साळवे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर जायखेडा पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूंचे गैरसमज दूर झाले आणि वादावर पडदा पडला. अशी होती पोस्ट : ताहाराबाद येथील गजानन साळवे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर संदेश प्रसारित केला होता. ताहाराबाद-सटाणा मार्गावरील महादेव मंदिर परिसर तसेच मुल्हेर येथील पेट्रोल पंपाजवळ वाहने अडवून पैसे मागितले जात असल्याचा त्यात उल्लेख होता. अचानक वाहनांसमोर आल्याने अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस व प्रशासनाने दखल घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले होते. हा संदेश विविध ग्रुपवर प्रसारित झाला. हा वाद गैरसमजातून निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंशी चर्चा करून गैरसमज दूर केले असून, आता वाद पूर्णपणे मिटला आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी संयम बाळगावा. – सागर काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा आमच्या समाजाची बदनामी होईल अशी चुकीची माहिती पसरवल्यामुळे आम्ही विरोध केला. पोलिसांनी मध्यस्थी करून गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळे हा वाद आता इथेच संपवत आहोत. – तृतीयपंथी, गुरुआई माझा उद्देश कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा बदनामी करण्याचा नव्हता. वाहतुकीच्या समस्येबाबत गैरसमजातून पोस्ट शेअर झाली. पोलिसांच्या मध्यस्थीने गैरसमज दूर झाले असून, पोस्ट हटवण्यात आली आहे. – गजानन साळवे, पोस्टधारक.
Source link
सोशल मीडिया पोस्टवरून ताहाराबादमध्ये तणाव:तृतीयपंथीयांचा साळवे यांच्या घरासमोर ठिय्या; पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर पडदा